सोलापूर: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने अकलूज येथे महागाई व गॅस दरवाढीच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले रस्त्यावर चूल मांडून महिलांनी भाकरी थापल्या व दाळ शिजवत गॅस दरवाढीचा निषेध नोंदविला यावेळी गॅस सिलेंडरला हार घालत अनोखे आंदोलन केले. युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे, शिवसेना तालुका प्रमुख संतोष राऊत, युवा सेना उपजिल्हा प्रमुख सोनू पराडे-पाटील, महिला आघाडी जिल्हा प्रमुख पुनमताई अभंगराव, युवा सेना तालुका प्रमुख सुभाष काकडे, उपजिल्हा प्रमुख नामदेव नाना वाघमारे, अकलूज शहर प्रमुख अनिल बनपट्टे, युवा सेना शहर प्रमुख शेखर खिलारे आदी उपस्थित होते.
यावेळी बस हुई महंगाई की मार, नहीं चाहिये मोदी सरकार.., अब की बार महंगाई की मार.., मोदी सरकार हाय हाय.., गॅस दरवाढीचा निषेध असो.., अशा घोषणा देत आणि लाकडानी पेटवलेल्या चुलीवर भाकरी भाजत डाळ भात शिजवत आंदोलन करण्यात आले. युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे म्हणाले की, २०१३ साली घरगुती गॅस चे दर ४१० रुपये होते तेच दर २०२३ रोजी ११५० रुपये झाले. आज राज्य व केंद्र सरकार या दोघांनीही महागाईने सामान्य जनतेचे हाल केले असून पुढील काळात हे आंदोलन अधिक व्यापक केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणत महागाईपासून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न राज्याच्या अधिवेशनात महागाईच्या मुद्द्यावर सरकार काहीच बोलत नाही. महाराष्ट्रावर बोलणाऱ्या इतरांचा सत्कार करायचा आणि खासदार संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणायचा असे करून सरकार महागाईपासून जनतेचे लक्ष विचलित करु पाहत आहे. महागाईने जनतेचे जगणे मुश्किल बनले आहे. जनतेला पुन्हा चुली पेटवाव्या लागणार आहेत. म्हणूनच आज आम्ही चुलीवरील भाकरी भाजून डाळ भात शिजवून आंदोलन छेडत आहोत, असे शिवसेना उपजिल्हा प्रमुख नामदेव वाघमारे म्हणाले.