आप्पासाहेब पाटील
सोलापूर : दुहेरीकरणानंतर झालेल्या विद्युतीकरणाच्या कामामुळे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दौंड-सोलापूर-कलबुर्गी-वाडी मार्गावर रेल्वे गाडी ताशी १३० किलोमीटर वेगाने धावणार आहे. त्यादृष्टीने रेल्वे विभागाचे काम अंतिम टप्प्यात आले असून नव्या वर्षात प्रवाशांचा प्रवास सुखकर, जलद व कमी वेळात होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
२०२३-२४ साठी ट्रॅकचे नूतनीकरण आणि ट्रॅक देखभाल कामाच्या उद्दिष्टाच्या पुढे वाढ होत आहे. मध्य रेल्वे गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. विविध विभागांमध्ये पायाभूत प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी सुविधांची कामे केली जात आहेत. यामध्ये मल्टीट्रॅकिंग (एका विभागात अनेक ट्रॅक टाकणे), ओव्हर हेड इक्विपमेंट रेग्युलेशन, सिग्नलिंग कामे आणि इतर तांत्रिक कामे यांचा समावेश होतो. दौंड-सोलापूर-कलबुर्गी-वाडी अंतर ३३७.४४ किमी असून या मार्गावर ताशी १३० किमी वेगाने गाड्या धावण्याचे काम सुरू आहे. याशिवाय १७ किमीच्या पुणतांबा-शिर्डी विभागावर ७५ किमी प्रतितास वरून ११० किमी प्रतितास आणि ९ किमीच्या बडनेरा-अमरावती सेक्शनवर ६५ किमी ताशी वरून ९० किमी प्रतितास वेग वाढला आहे.
तांत्रिक तपासणीनंतर घेतला महत्वाचा निर्णय
ट्रॅक भूमिती सुधारून कायमस्वरूपी वेग निर्बंध (पी.एस.आर) हटवल्याने मध्य रेल्वेवरील गाड्यांच्या वेगातही वाढ झाली आहे. ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत एकूण ९ पीएसआर काढण्यात आले आहेत आणि आणखी काढण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सुरक्षेच्या सर्व बाबी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तांत्रिक तपासणी केल्यानंतर या गाड्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. यामुळे गाड्यांची धावण्याची वेळ कमी होईल आणि ट्रेनच्या हालचालींची एकूण वक्तशीर सुधारण्यात येणार आहे.