सतरा हजार पदवीधरांना सोलापूर विद्यापीठाकडून पदवी प्रदान
सोलापूर विद्यापीठाचा अठरावा दीक्षांत समारंभ उत्साहात
सोलापूर : केवळ पदवी प्रमाणपत्रावर नोकरी मिळणार नाही. विविध कौशल्ये आत्मसात केल्यानंतरच नोकरी मिळू शकेल. विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करावीत. आता जग वेगाने बदलत आहे, त्यामुळे या नव्या बदलास सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी सक्षमपणे तयार राहावे आणि येणाऱ्या आव्हानांना तोंड देत संकटाशी सामना करण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. सुहास पेडणेकर यांनी केले.
सोमवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा अठरावा दीक्षांत समारंभ कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. पेडणेकर हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू प्रा. डॉ. राजेश गादेवार, कुलसचिव योगिनी घारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपुर, वित्त व लेखाधिकारी सीए श्रेणीक शाह व विविध विद्याशाखेचे अधिष्ठाता यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी एकूण 17 हजार 191 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आले. याचबरोबर 50 संशोधक विद्यार्थ्यांना पीएच. डी पदवी तर 57 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आले. विविध विद्याशाखेच्या अधिष्ठातांनी स्नातकांना पदवी देण्याची विनंती केल्यानंतर कुलगुरूंनी पदवी बहाल करत असल्याचे घोषित केले. विद्यापीठाच्या विकासाच्या अहवालाचे वाचन कुलसचिव योगिनी घारे यांनी केले. मान्यवरांचा परिचय डॉ. अंजना लावंड यांनी करून दिला.