सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात २७ ते ३१ मे दरम्यान ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन विद्यापीठाच्या कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्रामध्ये करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन, मुबंई विद्यापीठाच्या दूरस्थ व मुक्त शिक्षण केंद्रातील विज्ञान व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. मंदार भानुशे, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, वित्त व लेखा अधिकारी श्रेणिक शहा, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. राजेंद्र वडजे, ज्ञानस्रोत केंद्राचे प्र. संचालक चंद्रकांत गार्डी हे उपस्थित होते. या प्रदर्शनामध्ये अहिल्यादेवींच्या कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे. अहिल्यादेवींच्या अव्दितीय कार्यांची ओळख सर्वांना व्हावी, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्हयातील विद्यार्थी तसेच नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्राचे प्रभारी संचालक चंद्रकांत गार्डी यांनी केले आहे.
रांगोळीतून अहिल्यादेवींचे चित्र व कार्यसोलापूर विद्यापीठात, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. यावेळी अनेक स्पर्धकांनी सुबक रांगोळी काढत अहिल्यादेवींच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.