सोलापूर : माघ यात्रा सुरक्षित व निर्विघ्नरित्या पार पाडण्यासाठी यात्रा कालावधीत भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या आहे. शिवाय वारकरींच्या वेशात शेकडो पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. भाविकांना सरंक्षण देण्यासाठी, चोरी रोखण्यासाठी वारकरी वेषात पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात केले आहेत. तर १२५ सीसीटिव्ही कॅमेरॅच्या माध्यमातूनही लक्ष ठेवले जात आहे, असे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.
माघ शुध्द एकादशी बुधवार १ फेब्रुवारी २०२३ रोजी असून, या यात्रेचा कालावधी २६ जानेवारी ते ५ फेब्रुवारी असा आहे. या यात्रा कालावधीत श्री. विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी पंढरपूरात मोठ्या प्रमाणात भाविक येतात. यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांच्या आरोग्य, स्वछता व सुरक्षेला प्रशासनाने प्राधान्य दिले असून, भाविकांच्या मदतीसाठी चार ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती प्रातांधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
माघी वारीत येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा तात्काळ मिळाव्यात त्याचबरोबर आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतेही गैरसोय येऊ नये यासाठी पत्राशेड, ६५ एकर, चंद्रभागा वाळवंट, विठ्ठल-रुक्मिणी मंदीर या चार ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना केली आहे.तसेच चंद्रभागा नदीपात्रात स्नानासाठी भाविक मोठ्या प्रमाणात जातात त्यांच्या सुरक्षेसाठी आपत्ती व्यवस्थानतर्गंत दोन यांत्रिक बोटी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह तैनात ठेवण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
पंढरपुरात २२७ दिंड्या दाखलमाघी यात्रेच्या कालावधीत पंढरपूरात येणाऱ्या दिंड्याना मुक्कामासाठी तसेच भजन किर्तनासाठी प्रशासनाकडून मोफत जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ६५ एकरमध्ये ४३५ प्लॉटचे वाटप झाले असून, २२७ दिंड्या विसावल्या आहेत. तसेच ३ लाख ३८ हजार २२७ भाविकांची नोंदणी केली असून,सध्या १ लाख १० हजार भाविक दाखल झाले आहेत. ६५ एकरमध्ये भाविकांसाठी नगरपालिका प्रशासनाकडून पिण्याचे शुद्ध पाणी,लाईट, सुरक्षा, आरोग्य,शौचालय आदी आवश्यक सुविधा उलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. भाविकांच्या मदतीसाठी व आवश्यक सेवा सुविधा देण्यासाठी येथे आपत्काली मदत केंद्र २४ तास कार्यरत ठेवण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी सांगितले.