सोलापूर : गजबजलेला विजापूर वेस..रिक्षासह अनेक वाहनांची रांग..त्याला लावलेले झेंडे..डोक्यावर पगडी अन गळ्यात उपरणं घालून लहान मुलं अन तरुणाईने 'नबी का दामन नही छोडेंगे', 'आज हमारे नबी पैदा हुए...'चा नारा देत शहरातून शोभायात्रा काढली. पैगंबर जयंतीनिमित्त सोलापुरात शोभायात्रा उत्साहात निघाली. यंदा गणपती विसर्जन आणि मोहम्मद पैगंबर जयंती एकाच दिवशी आली. त्यामुळे मुस्लिम बांधवांच्यावतीने शुक्रवार, २९ सप्टेंबर रोजी पैगंबर जयंतीनिमित्त सकाळी ९ वाजता शोभायात्रा निघाली.
सर्वप्रथम पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, राजन जाधव, माजी आमदार नरसिंग मेंगजी, राजा सरवदे, नानासाहेब काळे, आनंदराव चंदनशिवे, बापू ढगे, राम गायकवाड, बाळासाहेब वाघमारे यांनी विजापूर वेस येथे उपस्थिती लावली. जुलूस कमिटीच्यावतीने त्यांचा सत्कार करून शोभायात्रेला सुरूवात करण्यात आली. मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीप्रमाणे सर्वधर्मिय बांधवांनी सहभाग नोंदवत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविले. तसेच पाच्छा पेठ, भारतीय चौक, कौंतम चौक, मधला मारुती परिसरात मुख्य शोभयात्रेत इतर सामाजिक संस्थांच्या शोभायात्रा सहभागी झाल्या.
यावेळी जुलूस कमिटीचे अध्यक्ष विश्वस्त ॲड. यु. एन. बेरिया, विश्वस्त म. हनीफ बडेपीर, अ. वाहिद नदाफ, माजी महापौर आरीफ शेख, उत्सव समितीचे अध्यक्ष हाजी मतीन बागवान, कार्यध्यक्ष शकील मौलवी, जनरल सेक्रेटरी अख्लाक दिना यांच्या प्रमुख उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.