सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालय कंट्रोल रूम (जुने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हापरिषद ) येथे नागपंचमीच्या दिवशीच रात्री सव्वा अकराच्या दरम्यान कार्यालयातील टेबलाजवळ पोलिसांना एक सर्प निदर्शनास आला. पी.एस.आय. शिंदे यांनी तात्काळ या घटनेची खबर सोलापूर शहर पोलीस कंट्रोल रूम येथे कळवली व सर्पमित्रांची मदत हवी असल्याचे सांगितले.
शहर पोलीस कंट्रोल रूम येथून निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेचे संस्थापक सर्पमित्र भीमसेन लोकरे यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून या घटनेची माहिती कळविली व पी.एस.आय. शिंदे यांना संपर्क क्र. देऊन सर्पमित्र भीमसेन लोकरे यांच्याशी संपर्क करण्याचे कळवले. पी.एस.आय. शिंदे यांचा दूरध्वनी येताच, सर्पमित्र भीमसेन लोकरे हे सर्पमित्र अशरफ शेख व सहकारी यांच्या समवेत त्या ठिकाणी धाव घेऊन सर्पाचा शोध घेतला असता तेथे टेबलाच्या खाली एका कोपऱ्यामध्ये छोटासा तस्कर जातीचा बिनविषारी सर्प आढळून आला. त्या सर्पास सर्पमित्र भीमसेन लोकरे यांनी सुरक्षितरित्या पकडून तेथील उपस्थित पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना सपाविषयीं महत्वपूर्ण माहिती दिली.
दरम्यान, सर्प पकडताच व तो आढळलेला सर्प बिनविषारी असल्याचे समजताच तेथील कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात पडला. इतक्या रात्री देखील वेळेत सेवा दिल्या बद्दल अधिकारी पी.एस.आय शिंदे यांनी निसर्गप्रेमी सर्पमित्रांचे आभार मानले.