सोलापूर : दैनंदिन जीवनासाठी अत्यावश्यक व मूलभूत गरज झालेल्या विजेचा वापर करून देखील सद्यस्थितीत सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यातील १ लाख ४८ लाख घरगुती ग्राहकांकडे २२ कोटी ७८ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. दरम्यान, वीजबिल वसुलसाठी सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यातील सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचारी आणि विशेष पथके थकबाकी वसूलीसाठी ‘ऑन फिल्ड’ वर असल्याचे सांगण्यात आले.
घरामध्ये टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, विविध उपकरणे, डिश टिव्ही, दोन ते तीन मोबाईल, विद्युत वाहने, ऑनलाईन शिक्षण व कामे इत्यादी प्रामुख्याने विजेवरच अवलंबून आहेत. मात्र इतर खर्चाच्या तुलनेत ग्राहकांकडून केवळ वीजबिल नियमित भरण्यास फारसे प्राधान्य दिले जात नसल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे थकबाकी देखील वाढत आहे. वीजबिलांच्या वसूलीवरच महावितरणचा संपूर्ण आर्थिक डोलारा अवलंबून आहे.
वीजबिलाची थकीत रक्कम प्रत्येक ग्राहकांकडे कमी अधिक असली तरी सध्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे थकबाकी आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून प्रादेशिक संचालक अंकुश नाळे हे पश्चिम महाराष्ट्रात दौऱ्यावर असून थेट शाखा कार्यालयांपर्यंत वीजबिल वसूलीचा आढावा घेत आहेत. सोबतच महावितरणचे सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचारी आणि विशेष पथके थकबाकी वसूलीसाठी ‘ऑन फिल्ड’ आहेत. ‘ना नफा, ना तोटा’ (रेव्हेन्यू न्यूट्रल) तत्त्वाने वीजसेवा देणाऱ्या महावितरण सध्या ग्राहकांकडे असलेल्या थकबाकीमुळे आर्थिक संकटात आहे. त्यामुळे वीजबिलांच्या थकबाकी वसूलीला वेग देण्यात आले आहे.