जिल्हा परिषदेच्या दीड लाख विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे चार कोटींचा निधी जमा झाला आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून गणवेशाचे निधी वाटप शाळांना होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांतील पहिली ते आठवीच्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जाणार आहेत. यापैकी एक गणवेश पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीने खरेदी करायचे असून त्यासाठीचे अनुदान वर्ग करण्यात येणार आहे. दुसऱ्या गणवेशाचे कापड शासन खरेदी करून देणार असून, शाळा व्यवस्थापन समिती त्यातून गणवेश शिवून घेणार आहे. एका गणवेशाची किंमत ही ३०० रुपये इतकी असणार आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेत पहिली ते आठवीच्या १ लाख ५४ हजार ८८३ विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार आहेत. पूर्वी शासनाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाच गणवेश मिळत होता. या वर्षीपासून शासनाने सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन गणवेशांचे पैसे शासनाकडून शाळा व्यवस्थापन समितीला दिले जात होते.
महिला बचत गट शिवतील दुसरा गणवेशआगामी शैक्षणिक वर्षापासून एक गणवेश शाळा व्यवस्थापन समिती आणि दुसरा गणवेश राज्य सरकार देईल. पूर्वीप्रमाणेच एक गणवेश शाळा व्यवस्थापन समिती खरेदी करून विद्यार्थ्यांना देणार आहे. दुसऱ्या गणवेशासाठी राज्य सरकार शाळा व्यवस्थापन समितीला कापड उपलब्ध करून देईल. नंतर शाळा व्यवस्थापन समिती हे कापड महिला बचत गटांकडून किंवा स्थानिक पातळीवर शिवून घेईल. यासाठीचा खर्च राज्य सरकार समितीला देणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.