आषाढी यात्रा सोहळ्याअगोदर पंढरपुरातील विविध मैदाने, रस्ते, पालखी तळ, मठांचा परिसर या परिसरातही स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. हा आषाढी यात्रा सोहळा प्रतिकात्मक होणार असल्याने प्रत्येक पालखीसोबत जवळपास ५० वारकरी येणार आहेत. मानाच्या दहा पालख्यांनाच आषाढी यात्रा सोहळ्यासाठी परवानगी दिली आहे. तरीही कोराेनाचा वाढता प्रादुर्भाव व इतर रोगराई पसरू नये यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आढावा बैठकीनुसार पंढरपूर शहरात आषाढीच्या पार्श्वभूमीवर विविध नियोजन करण्यात येत आहे. ६५ एकर पालखी तळ, चंद्रभागा वाळवंटातील स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. एकाच दिवसात जवळपास दीडशे कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने भक्त पुंडलिक मंदिराचा परिसर, दत्त घाट, कासार घाट, विप्रदत्त घाट, महाद्वार घाट परिसरात जेसीबी व कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने ही स्वच्छता मोहीम राबवून शेकडो टन कचरा गोळा करण्यात आला.
नगरपालिकेने राबविलेल्या या स्वच्छता मोहिमेमुळे गेल्या अनेक दिवसांपासून दुर्लक्षित असलेले वाळवंट चकचकीत करण्यात आले. ही मोहीम आषाढी यात्रा सोहळा संपेपर्यंत टप्प्या-टप्प्याने राबविण्यात येणार आहे. याशिवाय उद्यापासून शहरातील रस्त्यांवर असलेले खड्डे बुजविणे, शहरातील दिवाबत्तीची दुरुस्ती करणे, वाखरी पालखी तळाची दुरुस्ती, स्वच्छता आदी कामांना सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी दिली.
फोटो लाईन ::::::::::::::::
चंद्रभागा वाळवंटात पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने सुरू असलेली स्वच्छता मोहीम.