दरम्यान, संबंधित शेतकरी प्रल्हाद केदार यांनी चोरीस गेलेले डाळिंब आटपाडी, सांगोला, मंगळवेढा या ठिकाणी कोणी विक्रीस आणली आहेत का ? याचा शोध घेतला. मात्र, चोरटा सापडला नाही. शेवटी त्यांनी बुधवार ३ मार्च रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
केदार यांनी त्यांच्या दोन एकर क्षेत्रापैकी पाऊण एकरात भगव्या जातीची ४०० डाळिंबाच्या झाडांची लागवड केली आहे. त्याचा चालू बहार ऑगस्ट २०२० मध्ये धरला होता.
सध्या बागेतील डाळिंब विक्रीसाठी तयार झाली होती. दरम्यान, २८ फेब्रुवारी रोजी त्यांनी दिवसभर बागेत काम करून सायंकाळी ७ वाजता घराकडे परतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १ मार्च रोजी सकाळी १० वाजता त्यांच्यासह घरातील सर्वजण बागेत गेले असता झाडावरील डाळिंबे गायब असल्याचे दिसून आले. त्यांनी बागेत फिरून फेरफटका मारला असता झाडावरील सर्व डाळिंबे चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्याने साधारण एक टन भगव्या जातीचे डाळिंब चोरून नेल्यामुळे केदार यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी सांगोला पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.