सोलापूर : दीड महिन्याचे बाळ.. अगदी गुटगुटीत.. बाळाला पावडर.. गंध लावून नटवले... थंडी वाजू नये म्हणून त्याला कानटोपीही घातली. पोटच्या गोळ्यावर एवढा जीव लावणाऱ्या मातेने काय केले तर त्याला रेल्वे मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सोडून जे करायचे नाही तेच केले. बाळाच्या रडण्याच्या आवाजाने पादचारी तेथे गेला. पोलिसांना बोलावून बाळाला त्यांच्या कुशीत स्वाधीन केले. वैद्यकीय तपासणीनंतर आता बाळ पाखर संकुलातील पाळण्यात रमले आहे.
सचिन मुकुंद माने (वय ३६, रा. दीक्षा अपार्टमेंट, माणिक चौक) हे आपल्या मित्रांसमवेत २१ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता पायी चालत जात होते. रेल्वे मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ आले असता त्यांना लहान बाळ रडत असल्याचा आवाज आला. आवाज कुठून येत आहे, हे पाहण्यासाठी त्यांनी प्रवेशद्वाराजवळ नजर टाकली असता त्यांना दीड महिन्याचे बाळ रडत असल्याचे दिसून आले. ते बाळा जवळ गेले, त्यांनी इतरत्र त्याची आई कुठे आहे का? याची पाहणी केली. मात्र, आसपास कोणीच दिसून येत नव्हते. आई कुठेतरी आजूबाजूला गेली असेल असा समज करून ते बराच वेळ बाळाजवळ थांबले. रडणं बंद व्हावं म्हणून ते बाळाला खेळवू लागले. मात्र बाळ जास्त रडत होतं त्यामुळे त्यांनी काही अंतरावर जाऊन लोकांना विचारणाही केली; मात्र बाळासंदर्भात कोणालाही माहिती नव्हते.
दरम्यान, सचिन माने यांनी सदर बाजार पोलिसांना संपर्क साधून बाळाची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. बाळाला ताब्यात घेऊन दवाखान्यात त्याची तपासणी केली. बाळाचा शोध घेत कुणीतरी येईल या विचाराने पोलिसांनी सहा दिवस वाट पाहिली. मात्र बाळाची आई किंवा वडील कोणीही आले नाही.
माता-पित्याचा शोध सुरू
दीड महिन्याच्या बाळाला कुणी पाहिलं तर तिच्या मातेने असा कसा प्रकार केला, असाच प्रश्न निर्माण होतो. मातेने केलेल्या या प्रकारामुळे त्या बालकावर अनाथ होण्याची वेळ येणार आहे. दीड महिन्याचे हे बाळ अनाथ होऊ नये यासाठी सदर बझार पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकारी, कर्मचारी सध्या तरी त्या बाळाचे पालक होऊन त्या माता-पित्याचा शोध घेत आहेत.
बाळाचे आई-वडील रेल्वे स्टेशन अथवा एसटी स्टॅण्डवरून आलेत याची माहिती घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहोत. मुलासाठी अद्याप कोणीही आलेले नाही, आमचा शोध सुरू आहे. सध्या तरी आमचे कर्मचारी त्या बाळाच्या मायमाउलीची भूमिका बजावत आहेत. याचा अधिक आनंद आहे.
- एन.आर. तोटदार,
फौजदार, सदर बाजार पोलीस ठाणे