माढा तालुक्यातील तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी, महसूल, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग यांसारख्या अनेक प्रशासकीय विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेत नेमणूक करण्यात आली होती. त्या कर्मचारी व अधिकाऱ्यांतून संबंधित निवडणूक प्रक्रियेची प्रक्रिया व्यवस्थितरीत्या व कर्तव्यनिष्ठेने पार पाडली गेली. परंतु, अद्याप त्यांना निवडणूक कामकाजातील अतिकालिक भत्ते तत्कालीन निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्यांना मिळाले नसल्याची तक्रार राज्य निवडणूक आयुक्त, तत्कालीन जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे येथील विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे ई-मेलवर केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सन २०१९-२० मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये निवडणुकीची कर्तव्य ड्युटी करत येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जादा तास काम केले. त्यामुळे त्याबाबतचे संदर्भीय भत्ते हे तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांने देणे उचित होते. संबंधित भत्त्याची अनुदान रक्कमही त्यावेळेस माढा तहसील कार्यालयास आयोगाकडून प्राप्त झाली होती. परंतु भत्ते देण्यास तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नकार देण्यात आला. याबाबत त्यांना वारंवार विचारणा करूनही ते भत्ते वाटप करण्यात आलेले नाही. हे भत्ते तातडीने मिळावेत, अशी या कर्मचारी-अधिकाऱ्यांची मागणी आहे.
निवेदनावर एम. एस. पवार, एस. एस. बागल, आर. डी. बोराडे, एस. आर. गावडे, डी. बी. मराठे, डी. जी, सुतार, पी. आर. लोंढे, डी. आर. सारंगकर, ए. बी. ढवळे, डी. जी. वाघमारे,व्ही. एस. माढेकर, व्ही. एच. जगताप, बी. डी. ढेरे, आर. पी. काशीद, एस. एस. गोरे, डी. जे. जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
-----
माढा लोकसभा व विधासभा निवडणुकीसाठी काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा भत्ता हा अद्यापपर्यंत आयोगाकडून आलेला नाही. त्यामुळे तो त्यांंना मिळाला नसेल. भत्याशिवाय इतर असणारे भत्ते मात्र त्यावेळेस लगेच संबंधितांना दिले गेलेले आहेत. अतिकालिक भत्ते मात्र त्याचे अनुदान प्राप्त झाल्यानंतर लगेच मिळतील.
- ज्योती कदम, उपविभागीय कार्यकारी अधिकारी, कुर्डुवाडी