सध्या सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा असून, शहर व तालुक्यातील कोरोना रुग्णांना ऑक्सिजन बेडही उपलब्ध होत नाही. याकरिता आपल्या मतदारसंघातील गोरगरीब जनतेला ऑक्सिजन बेड उपलब्ध व्हावे, शहरातील ग्रामीण रुग्णालयाशेजारी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह या ठिकाणी सध्या सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरचे रूपांतर करणे, त्या ठिकाणच्या सुसज्ज इमारतीत ५५ बेड्सचे डीसीएचसी (डेडिकेटेड कोविड सेंटर) हॉस्पिटल सुरू करण्यासाठी, त्या ठिकाणी आवश्यक साधनसामग्री खरेदीसाठी ५० लाख रुपयांचा आमदार निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा नियोजन अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
त्याचप्रमाणे कोरोनाची महामारी संपताच ते साहित्य शासकीय ग्रामीण रुग्णालयात जमा करून घ्यावे व पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह सुरू करावे, अशी मागणीही या पत्रातून करण्यात आली आहे.
बार्शी शहराची लोकसंख्या पाहता येथील नागरिकांच्या सोईसाठी बार्शी नगर परिषदेसाठी नवीन रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी २२ लाख रुपयांचा आमदार निधी देत असल्याचे जाहीर केले.
बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय यासाठी कोरोना महामारीच्या विरोधात लढण्यासाठी या उपकेंद्रांमध्ये आवश्यक साधनसामग्रीसाठी २८ लाख रुपयांचा आमदार निधी देत असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत २०२१ च्या आमदार निधीतून ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र वैरागसाठी १० लाख रुपये, आगळगाव, पानगाव, चिखर्ड, उपळे (दु), गौडगाव यासाठी प्रत्येकी २ लाख रुपये, तडवळे येथे १ लाख रुपये, पांगरी ग्रामीण रुग्णालयासाठी ५ लाख रुपये, बार्शी शहर एक व दोन यासाठी प्रत्येकी १ लाख रुपये, त्याचप्रमाणे बार्शी नगर परिषदेस एक नवीन रुग्णवाहिका घेण्यासाठी २२ लाख रुपयांचा निधी देत असल्याचे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले.