सोलापूर : जमीन खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये सध्या घट झाली असून, मागील पंधरा दिवसात दुय्यम निबंधक कार्यालयात एक कोटी ४ लाख मुद्रांक शुल्क व नोंदणी फी जमा झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा खरेदी-विक्रीत घट झाल्याची माहिती दुय्यम निबंधक कार्यालयाने दिली आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जमीन खरेदी-विक्री, बंगला तसेच फ्लॅट खरेदीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात. कोरोनाचे संकट अद्याप गेलेले नाही. त्यामुळे दिवाळीच्या शुभमुहूर्ताला कोरोनाचा काही प्रमाणात फटका बसला आहे. शहरी भागाकरिता मुद्रांक शुल्क सहा टक्के आणि नोंदणी फी एक टक्के असा एकूण सात टक्के महसूल भरावा लागतो. तसेच ग्रामीण भागासाठी पाच टक्के मुद्रांक शुल्क आणि एक टक्के नोंदणी फी असा एकूण सहा टक्के महसूल भरावा लागतो. गतवर्षी शासनाने सरासरी तीन टक्के मुद्रांक शुल्क केले होते. डिसेंबर २०२०नंतर ही सवलत बंद झाली. त्यामुळे खरेदी-विक्रीच्या व्यवहारांत घट झाली आहे.
मालमत्ता खरेदी-विक्री
- नोव्हेंबर २०१९ - ५३४
- नोव्हेंबर २०२० - ७७३
- नोव्हेंबर २०२१ - २३४
........
किती कोटींचा महसूल
नोव्हेंबर २०२०मध्ये दोन कोटी ६८ लाख ८६ हजार आठशे रुपयांचे मुद्रांक शुल्क जमा झाले. त्या तुलनेत यंदा नोव्हेंबरमध्ये एक कोटी ४ लाख ४२ हजार रुपयांचे मुद्रांक शुल्क जमा झाले.
कोरोनामुळे सर्वांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही तीन टक्के मुद्रांक शुल्कची सवलत देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन शासनाला दिले आहे. मुद्रांक शुल्क व नोंदणी फीमध्ये सवलत मिळत नसल्याने खरेदी-विक्रीवर परिणाम होत आहे. खरेदी-विक्रीत घट झाली आहे.
- शशिकांत जिड्डीमनी, अध्यक्ष, सोलापूर क्रेडाई