पंढरपूर : माघ एकादशी २० फेब्रुवारी रोजी असून, या माघ वारी कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. सद्यस्थितीत पंढरपूर शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. शहरात येणाऱ्या भाविकांना तसेच स्थानिक नागरिकांसाठी सुरळीत व स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा यासाठी नगरपालिकेने १९, २० व २१ फेब्रुवारी रोजी शहरात दररोज पाणी पुरवठा सुरु ठेवण्याबाबत नियोजन करीत आहे. माघ वारीत पाच लाखांपेक्षा अधिक भाविक येण्याची शक्यता गृहित धरून प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे.
माघवारी नियोजनाबाबत प्रांत कार्यालय येथे प्रांताधिकारी अमित माळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीनंतर प्रांताधिकारी माळी यांनी पत्रकारांना म माहिती दिली. नगरपालिकेने नदीपात्रातील वाळवंटाची व घाटाची स्वच्छता, मंदीर परिसरात अग्निशमन व्यवस्था, तात्पुरते शौचालय उभारणी, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोडवरती कायम अतिक्रमण पथकांची उपलब्धता, आरोग्य विभागांची वैद्यकीय पथके, तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक, सुसज्ज रुग्णवाहिका कार्यरत ठेवाव्यात, याशिवाय मंदीर समितीने भाविकांना सुरळीत दर्शन मिळावे यासाठी पत्राशेड, दर्शनबारी व दर्शन मंडप येथे आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशा सूचना प्रांताधिकारी माळी यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीत माघी वारी कालावधीत भाविकांसाठी नगरपलिका प्रशासनाने केलेल्या व करण्यात येणाऱ्या सोयी- सुविधांची माहिती उपमुख्याधिकारी सुनिल वाळुंजकर दिली. यावेळी प्रांतधिकारी माळी यांनी सार्वजनिक बांधकाम, एस.टी.महामंडळ, तहसिल, उप प्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस विभाग, पाटबंधारे आदी विभागांचा आढावा घेवून संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या.