अक्कलकोट : जुना किणीरोडजवळ शासनाने मंजूर केलेली बाग व्हावी म्हणून एक गट तर ती होऊ नये म्हणून दुसऱ्या गटाने नगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. विशेषत: दोन्ही गट भारतीय जनता पक्षाचे असल्याने दोन्ही गटांचा एकमेकांना आहेर दिल्याची चर्चा रंगली आहे. उपोषण मागे घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत भाजपचे एक शिष्टमंडळ प्रयत्नशील होते.
किणीरोड ग्वल्ल वस्ती येथील नगरपालिकेच्या मालकीच्या आरक्षित खुल्या जागेत बाग विकसित होणार आहे. ज्येष्ठांसह लहान मुलांना बागडता येणार असल्याचे मत ग्वल्ल समाज पंच कमिटीचे आहे. बागेच्या मागणीचा आग्रह करीत नगरपालिकेसमोर नगरसेवक जितेंद्र यारोळे, ईरेशा यारोळे, सुखदेव चिंचोळकर, तुळजाराम यारोळे या गटाने उपोषणाला प्रारंभ केला आहे.
मात्र, विरोधी गटाने अर्थात बाग हटाव संघर्ष समितीचे ती बाग होऊ नये असे म्हणणे आहे. त्याठिकाणी स्मशानभूमी आहे. बाग झाल्यास मृत लोकांवर अंत्यसंस्कार कुठे करणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे. शहरात मैंदर्गी रस्त्यावर हिंदू स्मशानभूमीजवळील बागेची दुरवस्था झाली आहे. या बागेत मोकाट जनावरे फिरतात. शहरातील तारामाता उद्यान, स्वामी समर्थ उद्यान, प्रमिला पार्क उद्यान अशी अनेक उद्याने ओस पडली आहेत. याच बागांचे पुनरुज्जीवन केल्यास हजारो लोकांना फायदा होणार असल्याचे म्हणणे आहे. अंकुश चौगुले, रिपाइंचे अविनाश मडीखांबे, नगरसेवक विकास मोरे, अंबुबाई कामनूरकर, अश्विनी मोरे, अमर सिरसाट, सुनील खवळे, योगेश पवार, प्रसाद माने, अप्पू पराणे, ऋषिकेश लोणारी, सिद्धराम माळी हे उपाेषणात सहभागी होत आहेत.
उपोषण सोडविण्यासाठी उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, महेश हिंडोळे, बसलिंगप्पा खेडगी, उत्तम गायकवाड, सलीम येळसंगी हे रात्री उशिरापर्यंत प्रयत्नशील होते.
---
बाग होऊ नये म्हणून उपोषणाला बसलेल्या नगरसेवकांनी कायदेशीर बाबी पूर्ण होण्यापूर्वी हरकत घ्यायला हवी होती. बाग होण्यासाठी शासनाची कार्यवाही पूर्ण झाली आहे. कागदोपत्री बागेची जागाही आरक्षित आहे. आम्ही कोणालाही उपोषणाला परवानगी दिलेली नाही.
- सचिन पाटील
मुख्याधिकारी
-----
पोलीस ठाण्याकडून कोणालाही उपोषणास परवानगी दिलेली नाही. यासाठी संबंधित गटाचे अर्ज प्राप्त झाले आहेत. उपोषणास मात्र चारच लोक बसू शकतात. त्यापेक्षा अधिक लोक बसल्यास कारवाई होईल.
- गोपाळ पवार
पोलीस निरीक्षक, उत्तर पोलीस ठाणे.