कोरोनामुळे सर्व देश ठप्प असताना पुणे, मुंबईवरून गावाकडे आलेल्या सुशिक्षित युवकांनी दहा लाख सीडबॉलचे रोपण केले होते. या प्रयोगानंतर आता प्रतिघर पंधरा झाडे वाटप केली आहेत. त्यामुळे सुर्डी शिवार हिरवाईबरोबरच शेतकऱ्यांना आर्थिक फायदा देखील होणार आहे.
सतत दुष्काळाचे चटके सोसलेल्या सुर्डीने सामूहिक प्रयत्नातून ५० हजार घनमीटर इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साठवून दुष्काळाला लिलया हद्दपार केले व ७५ लाखांचे बक्षीस मिळवत राज्याचा अव्वल नंबर पटकावला. त्यामुळे खा. ओमप्रकाश निंबाळकर यांनी संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत गावाला दत्तक घेतले. त्यामुळे आता गावच्या पायाभूत सुविधा पूर्ण होणार आहेत.
सध्या गावाने पाणी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेत सहभाग घेतला असून, १० हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट यातून साध्य केले आहे. त्यामुळे पुन्हा सरपंच सुजाता डोईफोडे, उपसरपंच अण्णासाहेब शेळके, माजी सरपंच विनायक डोईफोडे, काशिनाथ शेळके, मधुकर डोईफोडे, तानाजी डोईफोडे, बळी डोईफोडे, संतोष लोहार, आनंद खुने, ग्रामसेवक पांडुरंग कागदे व तालुका समन्वयक नितीन आतकरे आदींसह ग्रामस्थ दुसऱ्या स्पर्धेचे पहिले बक्षीस मिळवण्यासाठी झपाटून कामाला लागले आहेत.
----
‘जेवढे पावसाचे पाणी, तेवढीच पिके’
जूनमध्ये केलेल्या एक लाख सीडबॉल रोपणाची ९० टक्के उगवण झाली आहे. आता सात हजार फळझाडे व इतर चार हजार झाडे लावली आहेत. ‘जेवढे पावसाचे पाणी, तेवढीच पिके’ संकल्प केला आहे. त्याचबरोबर पिकात तणनाशक फवारणी न करता उलट जनावरांना पौष्टिक गवताचे बी टाकून चारा करणार आहोत. वीस नागरिकांनी याचे प्रशिक्षण घेतल्याचे माजी सरपंच विनायक डोईफोडे यांनी सांगितले.