सोलापूर : जिल्ह्यातील १०० अंगणवाडी स्मार्ट करण्याचे नियोजन करण्यात आले असून, अंगणवाडीत बसविलेल्या टीव्हीवर झळकणाऱ्या गाण्यांवर मुले ताल धरतील असे शिक्षण देण्याची तयारी करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत अंगणवाडीचा कारभार पाहिला जातो. काेरोना महामारीमुळे दीड वर्षापासून शाळांप्रमाणे अंगणवाडी केंद्रही बंदच आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविका घरोघरी भेट देऊन लाभार्थींच्या शिक्षण, आहार नियोजनेकडे लक्ष देत आहेत. दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाल्याने शाळा सुरू करण्याची तयारी झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ओसाड पडलेल्या शाळांची रंगरंगोटी करून विविध चित्रांनी भिंती बोलक्या करण्यात आल्या आहेत. अशाच पद्धतीने अंगणवाडी केंद्राचे रूप पालटण्याचा शासनाने प्रस्ताव दिला आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्र निवडून आदर्श अंगणवाडी तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. त्याप्रमाणे जिल्ह्यातील १०० अंगणवाडीची नावे शासनाला सादर करण्यात आली असून, या अंगणवाड्यांना किट मिळणार आहे.
काय असेल किटमध्ये
स्मार्ट अंगणवाडीत बालकांना रमण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य पुरविण्यात येणार आहे. यात मोठा स्क्रीनचा टीव्ही, सोबत मुलांची गाणी, पाढे, बाराखडी, विविध कृती करण्याचे व्हिडिओ असलेले पेनड्राइव्ह, खेळणी, वजनकाटा, भांडी असतील.
रंगरंगोटी करणार
स्मार्ट अंगणवाडीसाठी निवड झालेल्या अंगणवाडी केंद्राच्या इमारतीची रंगरंगोटी केली जाईल, वर्गात भिंतीवर चित्रे, पाढे रेखाटलेली असतील. विविध कोष्टके लावलेली असतील. अंगणवाडीत स्वच्छ पाणी, स्वच्छता व स्वयंपाकगृह, पंखा, दिव्यांची व्यवस्था असेल.
या आहेत त्या अंगणवाड्या
अक्कलकोट : नन्हेगाव, अंकलगी, नागणसूर, शिरवळ, जेऊर, सलगर, दर्शनाळ, चिक्केहाळ्ळी, रुद्देवाडी, इब्राहिमपूर, वागदरी, बार्शी : पांगरी, खडकोणी, ज्योतिबाची वाडी, काटेगाव, वैराग : वैराग, गूळपोळी, बावी, भालगाव, मळेगाव, मांडेगाव, करमाळा : कुंभेज, केम, वीट, केतूर स्टेशन, खडकी, रोषेवाडी, वांगी, वरकटणे, अरण, बावी, म्हैसगाव, खैराव, आलेगाव, निमगाव, सापटणे, पालवण, टेंभुर्णी, माळशिरस : नातेपुते, दहीगाव, गारवाड, पिलीव, मांडवे, निमगाव, वेळापूर, अकलुज, शंकरनगर, गणेशगाव, बोरगाव, प्रतापनगर, चाकोरे, मंगळवेढा : आंधळगाव, पाठखळ, बोराळे, माचणूर, खवे, कात्राळ, सलगर, हुलजंती, घोडेश्वर, नरखेड, देगाव, भोयरे, शेटफळ, औंढी, अनगर, तरटगाव, कोरवली, उत्तर सोलापूर : हगलूर, तिऱ्हे, कळमण, हिरज, पंढरपूर : पुळुजवाडी, वाखरी, पळशी, लक्ष्मी टाकळी, बेंदवस्ती, खडी, सांगवी, ईश्वर वठार, भोसे, सांगोला : वाकी घेरडी, खवासपूर, कमलापूर, हंगिरगे, शिवणे, महूद, चोपडी, कोळा, अजनाळे, डोंगरगाव, वझरे, दक्षिण सोलापूर : भंडारकवटे, मंद्रुप, बोरामणी, गावडेवाडी, हत्तूर, वळसंग, कुंभारी, बसवनगर.