मोहोळ : शेतकऱ्याकडून दोन शेळ्या खरेदी करून त्याला दोन हजार, पाचशे व शंभर रुपयाच्या आशा एकूण २६ हजार ५०० रुपये बनावट नोटा देऊन त्याची फसवणूक केली. याप्रकरणी दोघांविरोधात मोहोळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रविवारी मार्केट यार्ड परिसरात जनावरांच्या बाजारात हा प्रकार घडला. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार हनुमंत सुखदेव गुंड (रा. खंडोबाचीवाडी, ता. मोहोळ) हे मोहोळ येथील आठवडा बाजारात स्वतःच्या दोन शेळ्या विक्रीसाठी घेऊन आले होते. सकाळी ९ वा च्या दरम्यान त्या बाजारात गुंड यांच्या जवळ दोन अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी शेळ्यांची किंमत विचारली. त्यानुसार गुंड व त्या दोघाजनांमध्ये २६ हजार ५०० रुपयांना व्यवहार ठरला. यावेळी त्या दोन व्यापाऱ्यांनी आमचे वाहन मार्केट यार्ड समोर थांबले आहे. तुम्ही आमच्या बरोबर शेळ्या घेऊन रोडच्या कडेला चला, तुम्हाला तुमचे पैसे तिथेच देतो म्हणाले. हनुमंत यांनी शेळ्या घेऊन तिथे गेले. त्या दोघांनी २६ हजार ५०० रुपये मोजून दिले. हे पैसे तुमच्या खिशात ठेवा... चोरांचा खूप सुळसुळाट चालू आहे असे सांगत शेळ्या घेऊन निघून गेले.
थोड्या वेळाने गुंड यांनी पैसे बाहेर काढून पाहिले असता दोन हजार व शंभर रुपयांच्या नोटा वेगळ्या जाणवू लागल्या. या ठिकाणी थांबलेल्या लोकांना त्यांनी विचारणा केली असता त्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्या दोघांनी दोन हजार रुपयांच्या २ नोटा, पाचशे रुपयांच्या ४४ नोटा व शंभर रुपयांच्या ५ नोटा आशा एकूण २६ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा देऊन फसवणूक केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष माने करत आहेत.