सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार सायंकाळी संपत असला तरी पुढील दोन दिवस खूप महत्त्वाचे आहेत. काळजी करू नका, पण सावध राहा, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांना केली. अखेरच्या टप्प्यातील निवडणुकीचे राजकीय आणि सामाजिक वातावरण कसे होते, असे विचारल्यानंतर पवारांनी सुशीलकुमार शिंदे यांची मुख्य लढत कोणाशी होईल, असा प्रश्न विचारला. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर यांच्याशीच होईल, असे सांगितले.
शरद पवार रात्री सोलापूर मुक्कामी होते. मंगळवारी सकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार राजन पाटील आदींनी पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. मतदारसंघातील परिस्थिती जाणून घेतली. यानंतर परत जाताना शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार यांना बाजूला घेतले. दोघांसोबत १५ मिनिटांहून अधिक वेळ चर्चा केली. शहर आणि परिसरातील वातावरण कसे राहील.
मागील आठ दिवसांतील सामाजिक वातावरण कसे होते, याची माहिती घेतली. यावेळी पवार यांनी राष्ट्रवादीच्या वतीने शहरात घेण्यात आलेल्या विविध मेळाव्यांची, कार्यकर्त्यांच्या बैठकांची माहिती दिली.
साहित्यिक डॉ. गो. मा. पवार यांचे मंगळवारी पहाटे निधन झाल्याचे शरद पवार यांना सांगितले. ही बातमी ऐकून शरद पवारांना धक्का बसला. यानंतर शरद पवारांनी डॉ. गो. मा. पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जाण्याचा निर्णय घेतला.
पवारांनी व्यक्त केली नाराजी- तुमचा प्रचार संपला असला तरी तुम्हाला पुढचे दोन दिवस सावध राहावे लागेल. कोणत्याही पद्धतीने मागे राहू नका. सामाजिक वातावरणावर लक्ष ठेवा, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीतील काही लोकांनी स्वतंत्रपणे बैठका घेतल्या. त्यावरही पवारांनी नाराजी व्यक्त केली.