सोलापूर : हॉटेल मालकांच्या मनमर्जीला यापुढे लगाम बसणार आहे. कारण, जिल्हा अन्न प्रशासन ॲक्शन मोडवर असून वर्षभरात ८० हॉटेलमध्ये धाडी टाकून किचन रूमची तपासणी केली. यापैकी सतरा हॉटेल चालकांना सुधारणा नोटीस मिळाली असून १२ हॉटेल मालकांकडून ९६ हजाराचा दंड लावला आहे. एका हॉटेलचा परवाना कायमचा रद्द केल्याने जिल्ह्यातील हॉटेल चालकांनी धास्ती घेतली.
चालू वर्षात अन्न प्रशासनाने एकूण ८० हॉटेलवर कारवाई केली आहे. यातील ७ नमुने पुणे प्रयोगशाळेकडे पाठवले असून २ नमुने प्रमाणित करण्यात आले आहे. उर्वरित पाच नमुन्यांचा रिपोर्ट प्रलंबित आहे. ज्या हॉटेलवर धाडी टाकल्या आहेत, त्या हॉटेल मालकांना त्रुटींची पूर्तता करण्याची सूचना केली. काहींनी तत्काळ त्रुटींची पूर्तता केली. उर्वरित लोकांनी केली नाही. अशांना नोटीस पाठवून अलर्ट केले. यापुढेही कारवाईचा सपाटा सुरू ठेवणार असल्याची माहिती अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सुनील जिंतूरकर यांनी दिली.