सोलापूर : मुलाला मुलगा झाल्याने पाहण्यासाठी सोलापुरात आलेल्या महिलेची रिक्षात विसरलेली एक लाख रुपये रकमेची बॅग अवघ्या बारा तासाच्या आत परत करण्यात आली. गेलेले पैसे परत मिळाल्याने मिरज येथील शेतमजूर महिलेने आभार मानले. गुन्हे शाखेच्या वतीने ही कामगिरी करण्यात आली.
चंद्रकला मच्छिंद्र नार्वे (वय ४५), मच्छिंद्र नार्वे (वय ५५, दोघे रा. कुंभार एमआयडीसी, मिरज) यांच्या मुलाची सासरवाडी सोलापुरात आहे. सून प्रसूत झाल्याने नातवाला पाहण्यासाठी दोघे शनिवारी रात्री रेल्वेने सोलापुरात आले. रेल्वे स्टेशनसमोर राहुल तुकाराम शिंदे (वय २६, रा. न्यू बुधवार पेठ, सोलापूर) यांची रिक्षा (क्र.एम.एच १३ जी ९८४७) थांबवली. रिक्षात बसून दोघे शिवाजी चौकमार्गे बाळीवेस येथे उतरले. रिक्षात बसताना सीटच्या पाठीमागील बाजूस ठेवलेली बॅग घेण्यास विसरले. रिक्षा लांब गेल्यानंतर त्यांना बॅग नसल्याची जाणीव झाली. बॅगेत कपडे, मच्छिंद्र नार्वे यांची महागडी औषधे आणि एक लाख रुपये रोख रक्कम होती.
रिक्षा जाताना त्यांनी त्याचा नंबर पाहिला होता. नंबरवरून त्यांनी रेल्वे स्टेशन पोलीस चौकीत झालेल्या प्रकारची माहिती दिली. गुन्हे शाखेकडे हा तपास गेला असता पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शीतल शिवशरण, सहायक पोलीस निरीक्षक ऋषिकेश पवळ, राकेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सचिन बाबर, वसंत माने यांनी रिक्षाचा शोध घेतला. रिक्षा न्यू बुधवार पेठ येथे आढळून आली, रिक्षा चालक राहुल शिंदे यांना घरातून बोलावून विचारणा केली असता त्यांनी रिक्षातील सीटच्या पाठीमागे पाहिले असता बॅग आढळून आली. मिळालेली बॅग व त्यातील पैसे रिक्षा चालकाच्या हस्ते चंद्रकला नार्वे यांना देण्यात आले.
बॅग पाहून महिला गहिवरली...- एक लाख रुपये असलेली बॅग गेल्याने चंद्रकला मच्छिंद्र नार्वे या चिंतेत पडल्या होत्या. पती मच्छिंद्र नार्वे यांना किडनीचा आजार आहे. नातवाला पाहून ते उपचारासाठी दवाखान्यात जाणार होते. शेतात काम करणाºया चंद्रकला नार्वे यांनी पतीच्या उपचारासाठी गोळा केलेले एक लाख रुपये घेऊन सोलापुरात आल्या होत्या. बॅग गेल्याने त्यांच्यावर आभाळ कोसळले होते. त्यांना रात्रभर झोप लागली नव्हती, पोलिसांनी रिक्षा चालकाच्या हस्ते जेव्हा आहे तशी बॅग हातात दिली तेव्हा आभार मानत डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून दिली.