अंबादास वायदंडे
सुस्ते : सुस्ते (ता. पंढरपूर) येथील बाळासाहेब जगन्नाथ चव्हाण यांनी एक एकरात टोमॅटोचे १ हजार ८०० कॅरेट (३५ टन) तर काकडी पन्नास किलोच्या ६०० पिशव्या (३० टन) असे साडेपाच महिन्यांत दुहेरी भरघोस उत्पन्न घेऊन बाळासाहेब जगन्नाथ चव्हाण हे सुस्ते परिसरातील शेतकºयांचे मार्गदर्शक ठरले आहेत.
शेतामध्ये प्रामाणिकपणे कष्ट केल्यानंतर नक्कीच भरघोस उत्पन्न मिळते, हे बाळासाहेब चव्हाण यांनी दाखवून दिले आहे. बाळासाहेब चव्हाण यांचे बंधू पांडुरंग चव्हाण, चांगदेव चव्हाण व पुतणे चेतन चव्हाण यांच्या मदतीने ते शेतामध्ये नेहमी नवनवीन प्रयोग करतात आणि त्या पिकाचे व्यवस्थापन करून त्याच्यापासून भरघोस उत्पन्न घेतात. अतिशय कष्टाळू बाळासाहेब चव्हाण यांची ईश्वरवठार हद्दीत जमीन आहे. मशागत करून जमिनीमध्ये सहा फूट अंतराने सरी सोडून त्यात १३ हजार टोमॅटोच्या रोपांची लागवड केली. त्यास रासायनिक खताचा मात्रा व फवारणी करून त्याचे योग्य प्रकारचे व्यवस्थापन केले़ त्यानंतर ७० ते ८० दिवसांत १ हजार ८०० कॅरेट माल निघून त्याचे वजन ३५ टन इतके झाले आहे.
टोमॅटोला २८ ते ३० रुपये दर मिळाल्याने टोमॅटोपासून ७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर टोमॅटोची झाडे काढून टाकली, पण त्याचे फाउंडेशन काढले नाही़ त्याच सरींवर सव्वा फूट अंतरावर काकडीच्या बियांची लागवड केली़ तसेच सरीतून उसाचीही लागवड केली़ काकडीची लागवड केल्यापासून फवारणी, पाण्यातून रासायनिक खतांचा मात्रा देणे व नियमितपणे पाणी देणे असे व्यवस्थापन केले़ त्यामुळे काकडीची लागवड केल्यापासून ३१ दिवसांत काकडीचा बहार चालू झाला़ तेथून पुढे दीड महिना म्हणजे एकूण अडीच महिने काकडीच्या पिकाचा कालावधी आहे. या अडीच महिन्यांत पाणी, खुरपणी करून तसेच काकडीचे पीक हे वेलवर्गीय असल्याने टोमॅटोसाठी तयार केलेल्या फाउंडेशनवर काकडीच्या वेली सोडून त्याचे व्यवस्थापन केले़ एकरामध्ये ५० किलोच्या ६०० पिशव्या काकडी निघाली म्हणजेच एकूण वजन ३० टन इतके झाले आहे़ या काकडीला बाजारात प्रति किलोला १५ ते २० रुपये दर मिळाला़ त्यातून ६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले़
अशी साधली किमया..- केवळ एक एकर क्षेत्रामध्ये सुरुवातीच्या तीन महिन्यांच्या कालावधीत टोमॅटोपासून ७ लाख रुपयांचे उत्पन्न घेतले़ त्यानंतर टोमॅटोसाठी उभारलेले फाउंडेशन न काढता त्याच ठिकाणी काकडीच्या बिया लावून पुन्हा अडीच महिन्यांच्या कालावधीत काकडीपासून ६ लाख रुपयांचे उत्पन्न घेतले़ असे एकूण साडेपास महिन्यांच्या कालावधीत एकूण १३ लाख रुपयांचे उत्पन्न घेण्याची किमया बाळासाहेब चव्हाण यांना साधता आली़
- काकडी
- क्षेत्र - ४० गुंठे (एक एकर)
- कालावधी - ७५ दिवस
- उत्पादन - ३० टन
- दर - १५ ते २० रुपये
- उत्पन्न - ६ लाख रुपये
शेतामध्ये पाच ते साडेपाच महिन्यांच्या कालावधीत टोमॅटो व काकडी अशी दोन पिके घेऊन भरपूर उत्पन्न मिळाले़ तसेच त्याच शेतात उसाची लागवड केली आहे़ आता उसापासून उत्पन्न येणे बाकी आहे. कमी कालावधीत उसामध्ये जास्त फायदेशीर कोणते पीक येत नसल्याने सगळ्या पिकांपेक्षा काकडीचे पीक फायदेशीर आहे. या पिकापासून कमी कालावधीत कमी खर्चात जास्त नफा मिळवू शकतो. यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करून पिकाचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे.- बाळासाहेब चव्हाण, काकडी उत्पादक, शेतकरी सुस्ते.