सोलापूर : जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून सोलापुरातील जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर शासकीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला विविध संघटनांसह विविध राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. शुक्रवारी आंदोलनाचा तिसरा दिवस होता. यावेळी उपस्थित कर्मचा-यांनी जागरण गोंधळ घालत जुनी पेन्शन योजनेच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.
सोलापुरात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना समन्वय समितीच्यावतीने जागरण गोंधळ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आंदोलनातील कर्मचाऱ्यांनी जागरण गोंधळाच्या गाण्यावर तालही धरत उपस्थित खळखळून हसविले. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर गेले आहेत. २०३५ पासून थोडा-थोडा आर्थिक भार पडणार असताना समिती स्थापन करण्याचे नाटक कशासाठी करता. त्यासाठी तुम्ही जुनी पेन्शन योजना जाहीर करून राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना दिलासा द्या अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
जुनी पेन्शन लागू करा, वेतन त्रुटी दूर करा, कंत्राटी कर्मचारी सेवेत कायम करा, मागास वर्गीय कर्मचारी यांना पदोन्नती देणे अशा विविघ मागण्यांसाठी आक्रोश करण्यात येत आहे. सध्या अनेक शासकीय कार्यालयात शुकशुकाट दिसून येत आहे. आंदोलनाचा परिणाम जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयात जाणवू लागला असला तरी महापालिकेत मात्र फारसा परिणाम दिसून येत नसल्याचे चित्र आहे.