खेडभाळवणी येथील चार भाऊ अन् चार विवाहित बहिणी असलेले पवार परिवार सुखा-समाधानाने प्रपंचात रमले होते. चार बंधूंना सहा विवाहित मुले आणि १० विवाहित मुली. पवार परिवारातील तिसऱ्या क्रमांकाचे कारभारी असलेले बलभीम पवार (वय ७५) यांचे २३ जुलैला अल्पशा आजाराने निधन झाले. यावेळी अतीव दुःखाने तीन बंधू धाय मोकलून रडत होते. बलभीम पवार यांच्या निधनानंतर चार बंधूंमध्ये सर्वांत मोठे असलेले अंकुश पवार यांच्यासह मुलगा, सून आणि नातवंडे कोरोनाबधित झाली. त्याचबरोबर वामन पवार यांचे कौठाळी येथील जावई बाळकृष्ण चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली.
एकाबाजूला कारभाऱ्याचे दुःख पचविणे अशक्य असताना मोठ्या बंधूचे कुटुंबीय आणि जावयाला झालेली कोरोनाची बाधा याची सल मनात सहन करतच १२ ऑगस्ट रोजी दुसऱ्या क्रमांकाचे वामन पवार (वय ८५) यांची प्राणज्योत मालवली. दोन बंधूचे निधन आणि परिवारातील कोरोनाबधित व्यक्तींवर रुग्णालयात सुरू असलेले उपचार यामुळे पवार परिवार हतबल झाला होता. दरम्यान रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बंधू आणि पुतण्याला वामन पवार यांच्या निधनाची खबरबात कळू दिली नाही. अशातच सासरे वामन पवार यांच्या निधनाच्या केवळ आठ दिवसांच्या कालावधीत २० ऑगस्टला जावई बाळकृष्ण चव्हाण यांच्यावरही कोरोनाने आघात केला. पवार परिवारातील इतर व्यक्ती कोरोनावर मात करून सुखरूप घरी पोहोचले. पवार परिवारात घेडलेल्या तीन दुःखद घटनेतून सवरण्यापूर्वीच अंकुश पवार (वय ९०) यांच्यावर २४ ऑगस्टला कोरोनाने घाला घातला. यामुळे एका महिन्यात पवार परिवाराला एका मागून एक चार धक्के बसल्याने पवार परिवारावर शोककळा पसरली आहे.