सोलापूर : सोलापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे चित्र आहे. एकूण एक हजार २५९ बेड हे कोरोना रुग्णांसाठी आहेत. सध्या शहरात एक हजार एक बेड शिल्लक असून २५८ रुग्ण उपचार घेत आहेत.
कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवल्यामुळे प्रशासनातर्फे काळजी घेण्यात येत आहे. रुग्णसंख्या कमी असली तरी अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे कोरोनासाठी आरक्षित असलेले बेड हे इतर आजारांसाठी देण्यात आलेले नाहीत. यासाठी नियमावली ठरवली असून, कोरोना रुग्णांना रुग्णालयात प्रथम प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरात २७ ते ३० नोव्हेंबरदरम्यान एकही मृत्यू झाला नाही. शहरासोबत ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. तसेच जिल्ह्यात मृत्यूची संख्या कमी होत आहे.
कोट
कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी सर्वांना काळजी घ्यावीच लागणार आहे. इतर आजाराच्या रुग्णांसाठी बेड उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीही कोरोना रुग्णांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. औषधेही पर्याप्त प्रमाणात उपलब्ध आहेत.
- डॉ. प्रदीप ढेले,
जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर