आप्पासाहेब पाटील
सोलापूर : झाडे नुसती लावून चालणार नाहीत, ती जगायला हवीत. त्यांना जगविले तरच उद्याची समृद्धता टिकणार आहे. मागच्या पिढीचा वारसा पुढच्या पिढीने जपायला हवा, असा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सोलापूर-विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावरील गणेश नाईक प्राथमिक शाळेच्या ३५० विद्यार्थ्यांनी कंबर तलावाशेजारी असलेल्या स्मृती वनातील १ हजार झाडांना संजीवनी देण्याचे काम हाती घेतले आहे.
या मोहिमेसाठी मुलांच्या पालकांनीही प्रोत्साहन दिले असून, स्मृती वनाच्या परिसरातील नागरिकही यामध्ये सहभागी होत आहेत.टाकाऊ पाणी बाटलीचा वापर करून झाडांना ठिबक सिंचनासारखे पाणी देण्याची अनोखी शक्कल विद्यार्थ्यांनी लढविली़ या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे़ गणेश नाईक प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आठवडाभरापासून विजापूर रोड परिसरातील हॉटेल व्यावसायिक, भंगार विक्रेते तसेच रस्त्याच्या कडेला विखुरल्या गेलेल्या पाण्याच्या बाटल्या संकलित केल्या.
या बाटल्यांच्या झाकणाला व पाठीमागे छिद्र पाडून त्यात पाणी भरून, बाटलीत सुतळी टाकून छिद्राव्दारे ही सुतळी बाहेर काढून त्या बाटल्या झाडाच्या खोडाजवळ ठेवल्या आहेत़ दोन्ही छिद्राद्वारे थेंब थेंब पाणी रोपांच्या बुडाशी पाझरत आहे. एक बाटलीतील पाणी किमान सात ते आठ दिवसांपर्यंत चालणार अशी व्यवस्था या शाळेतील विद्यार्थ्यांनी केली आहे़ यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होऊन ऐन दुष्काळात झाडांना पाणी मिळत आहे.
वनीकरण विभागाने स्मृती वनात लावलेल्या ८ हजार झाडांपैकी सध्या १ हजार झाडांवर हा प्रयोग करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे स्मृती वनातील चिंच, शिस, करंज, नीम, आवळा, खैर, लिंब, सीताफळ,मिडशिंग, बोर, काशीद, कांचन, वड, उंबर, बेल, वावळा, ग्लेरेसिडीया अशा विविध प्रकारच्या हजारो झाडांना ऐन दुष्काळात नवी संजीवनी मिळत आहे. या उपक्रमाची पुढील जबाबदारी वनीकरण विभागाच्या सुवर्णा झोळ यांनी स्वीकारली आहे़ या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका सुरेखा बिराजदार, सहशिक्षक मदन पोलके, सहशिक्षिका स्मिता पाटील, मायादेवी पवार, विजयालक्ष्मी मेनकुदळे, संतोष हिरेमठ, अजिज जमादार, स्नेहल करंडे, प्रिया जवळगी, म्हेत्रे मॅडम, रुपाली लायने, संस्थेचे उपाध्यक्ष स्वामी यांनी परिश्रम घेतले़
पर्यावरणाचा दृष्टिकोन जपण्याचा उपक्रम- गणेश नाईक प्राथमिक शाळेच्या संस्था पदाधिकारी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, गुणवत्ता वाढ, नियमित अभ्यासाबरोबरच पर्यावरणाचा दृष्टिकोन जपण्याच्या उद्देशाने राबविलेला उपक्रम खरंच गौरवास्पद आहे असे मत सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड, विभागीय वन अधिकारी सुवर्णा माने यांनी व्यक्त केले़