सोलापूर : अखंड राजा शिवछत्रपती परिवाराकडून सोलापुरातील भुईकोट किल्ल्याची स्वच्छता करण्यात येणार आहे़ एक मार्च रोजी सकाळी आठ वाजता भुईकोट किल्ल्याची स्वच्छता करण्यात येईल़ त्यापूर्वी २९ फेब्रुवारी रोजी सकाळी पंढरपूर येथील चंद्रभागा नदीची स्वच्छता करण्यात येणार आहे़ या मोहिमेत राज्यभरातील एक हजार गडप्रेमी, शिवप्रेमी सहभागी होणार आहेत़ या स्वच्छता मोहिमेत सोलापूरकरांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन अखंड राजा शिवछत्रपती परिवाराचे अध्यक्ष आशिष घोरपडे यांनी केले आहे.
अखंड राजा शिवछत्रपती परिवार मागील साडेपाच वर्षांपासून महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांत दुर्ग स्वच्छता मोहीम राबवत आहे़ २९ फेब्रुवारीला परिवारातील कार्यकर्त्यांचे पंढरपूर येथे आगमन होणार आहे़ शनिवार, दि़ २९ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता चंद्रभागा नदी स्वच्छता मोहिमेला सुरुवात होणार आहे़ दोन तास स्वच्छता मोहीम झाल्यानंतर पंढरपूर शहरातून प्रभात फेरी काढण्यात येणार आहे़ स्वच्छता आणि वृक्षारोपण आणि गडकिल्ल्याच्या संवर्धनाबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे़ दुपारी तीन वाजता पंढरपुरातील वीरपत्नी आणि वीरमातांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती आशिष घोरपडे यांनी दिली.
अखंड राजा शिवछत्रपती...- शनिवारी सायंकाळी सहा वाजता अखंड राजा शिवछत्रपती परिवारातील सदस्यांचे सोलापुरात आगमन होणार आहे. सायंकाळी सात वाजता शिवस्मारक येथून हुतात्मा चौकापर्यंत जनजागृती फेरी काढण्यात येणार आहे़ सर्व सदस्यांचा मुक्काम मराठा मंदिर हॉल येथे असेल़ रविवार दि़ १ मार्च रोजी सकाळी सर्व गडप्रेमी भुईकोट किल्ल्यात एकत्र येणार आहेत.सकाळी सात वाजता ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र होईल़ आठ वाजता स्वच्छतेला सुरुवात होणार आहे़ दुपारी दीडपर्यंत भुईकोट किल्ल्याची स्वच्छता करण्यात येणार आहे़ त्यानंतर ४ वाजता सर्व गडप्रेमींना निरोप देण्यात येणार आहे़ या स्वच्छता मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन आशिष घोरपडे यांनी केले आहे़