एकरूख योजनेच्या माध्यमातून अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील जवळपास १७ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. ही योजना महत्त्वांकाक्षी आहे. ही योजना पूर्ण होत आली असून, उर्वरित कामांसाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ५० कोटी रुपये मंजूर करण्याचे आदेशदेखील देण्यात आल्याची माहिती या बैठकीचे अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिली. तसेच बहुप्रतीक्षित देगाव एक्स्प्रेस कॅनाॅलच्या २६ ते ६४ किमीमधील कामाचे सर्वेक्षण करण्यात यावे व भूसंपादन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीला माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जलसंपदा विभागाचे सचिव कोव्हिकर, स्वामी, कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक व्ही.जी. रजपूत, भीमा खोरे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डी.बी. साळे, सोलापूरचे अधीक्षक अभियंता जे.एस. शिंदे, पुण्याचे मुख्य अभियंता धुमाळ, अश्पाक बळोरगी, शिवराज स्वामी, कुरनूरचे सरपंच व्यंकट मोरे, विलास गव्हाणे, संजय मोरे, स्वीय सहायक मोहन देडे आदी उपस्थित होते.
..............
महाविकास आघाडीच्या सरकारमुळे स्वप्नपूर्ती
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले एकरुख योजना, देगाव एक्स्प्रेस कॅनाॅल व इतर विकासकामांच्या संदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. विशेष म्हणजे जलसंपदामंत्री जयंत पाटील व महाविकास आघाडीतील सर्व मंत्र्यांनी आजवर सहकार्य केले आहे. एकरुखच्या बाबतीत ऐतहासिक निर्णय शासनाने दिला आहे. तालुक्याची स्वप्ने लवकरच पूर्ण होतील.
- सिद्धाराम म्हेत्रे, माजी मंत्री
..................
बबलाद बॅरेजसाठी ५० लाखांची तरतूद
महाराष्ट्रातून बोरी नदीवाटे कर्नाटकात वाहून जाणारे पाणी बबलाद येथे अडवल्यास परिसरातील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते. यासाठी बबलादच्या बंधाऱ्याचे बॅरेजेसमध्ये रूपांतर करण्याची सूचना म्हेत्रे यांनी केली होती. यासाठी जलसंपदा विभागाकडून तातडीने सर्व्हे करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत व तातडीने ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचेही म्हेत्रे यांनी सांगितले.
(बातमीत जलसंपदामंत्री जयंत पाटील व चौकटीत सिद्धाराम म्हेत्रे यांचा फोटो घेणे.)