नगराध्यक्ष आसिफ तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा पार पडली. यावेळी १९८६ च्या कामगार विरुद्ध नगरपालिका या केसमध्ये औद्योगिक आणि उच्च न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निकाल दिला होता. त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा विषय पालिका प्रशासनाने समोर आणला होता. त्यावर झालेल्या चर्चेत विरोधी पक्ष नेते नागेश अक्कलकोटे यांनी पालिकेने या वादातील अस्थायी पदांना ठरावाद्वारे स्थायी करून पदाना मंजुरी देण्याची मागणी करत तूर्तास हा विषय स्थगित करावा, अशी भूमिका मांडली. तसेच मुळात सध्या नोकऱ्या नाहीत त्यामुळे सेवेत असणाऱ्याना सामावून घेण्याची मागणी केली. त्याला सत्ताधारी नगरसेवकांनी देखील हा कामगारांच्या नोकऱ्याचा विषय असल्याने उच्च न्यायालयाच्या निकाला विरोधात अपील न करण्याचा निर्णय घेतला.
कामगारांवर अन्याय होऊ नये अशी आमच्या पार्टीची भूमिका आहे. त्यामुळे लवकरच याचा विचार करून जादा कामगारांचा विषय मार्गी लावला जाईल, असे नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांनी स्पष्ट करत हा विषय स्थगित ठेवला.
या सभेत लातूर रोडवर विकसित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील भव्य आणि आदर्श अशा उद्यानाला लक्ष्मी-सोपान उद्यान असे नाव देणे. तसेच याच परिसरात विकसित झालेल्या भागाला लक्ष्मी-सोपान नगर नाव देण्याचा विषय मंजूर करण्यात आला.
शहराचा आगामी २०२१-२२ या वर्षाचा शहरात गटारी, रस्ते, खडीकरण व डांबरीकरण करणे, विस्तारित भागात विद्युतीकरण करणे आदी ३० कोटींचा आराखडा मंजूर करून पुढील मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आला.
सध्या गुंठेवारी फाईल करणे थांबलेले आहे. छोट्या प्लॉट धारकांची सोय व्हावी यासाठी गुंठेवारी कायद्याला एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा विषयही मंजूर करण्यात आला. महेदवी समाजाच्या कबरस्थानला महेदिया दायरा असे नाव देण्यात आले.
सभागृहातील चर्चेत नागेश अक्कलकोटे, विलास रेणके, गटनेते दीपक राऊत, अमोल चव्हाण यांनी भाग घेतला. ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळवणारे शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या अभिनंदनाचा आणि मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांच्या ही अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.
-----