आप्पासाहेब पाटील
सोलापूर : शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने अचानक कांद्याचे लिलाव बंद केले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी बाजार समितीत आंदोलन केले. तात्काळ लिलाव सुरू करावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला होता. शनिवारी बाजारपेठ बंद ठेवून दाखल झालेल्या कांद्याचा लिलाव केला जाईल, असे आश्वासन मिळताच शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
या आंदोलनाची सूचना मिळतात जेलरोड पोलिस ठाण्याचे पेालिसांचे पथक बाजार समितीत दाखल झाले. पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला. यानंतर बाजार समितीचे संचालक केदार उंबरजे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना त्यांच्या कांद्याचे काटे तात्काळ सुरू करत शनिवारी या कांद्याचे लिलाव होतील, असे जाहीर केले. त्याचबरोबर शनिवारी कुठल्याही प्रकारची नवीन आवक बाजारात होणार नाही, अशीही घोषणा त्यांनी केली. या घोषणेमुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. दरवर्षी बाजार समितीत कांद्याच्या लिलावावरून गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. लिलावासाठी आलेला कांदा तसाच पडून राहत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. एकीकडे भाव नसल्याने परेशान झालेल्या शेतकऱ्यांस लिलाव प्रक्रिया संथगतीने अन् अचानक बंद पाडल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.