सोलापूर - गेल्या 10 दिवसांपूर्वी 3 हजार रुपये प्रति क्विंटल जाणारा कांदा आता 1200 रुपये प्रति क्विंटल जात आहे. अचानकपणे कांद्याचे दर गडगडल्याने उन्हाळी कांदा लागवड केलेल्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त होत आहे.
मोडनिंब व परिसरातील अरण, जाधववाडी, बैरागवाडी, तुळशी, पडसाळी, भेंड या भागांत मोठ्या प्रमाणात कांदालागवड केली जाते. यंदाच्या वर्षी सुरुवातीला कांद्याचे दर तब्बल दोन महिन्यांपासून सोलापूर व मोडनिंब बाजारपेठेमध्ये तेजीत होते. अडीच हजाराच्या पुढेच दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. गेल्या दोन दिवसांत अचानकपणे दर कोसळले आहे. यंदाच्या वर्षी अतिशय चांगल्या प्रतीचा कांदा पीक शेतकऱ्यांनी आणले होते. अधून-मधून पडणारा पाऊस व धुके यामुळे काढणीस आलेला कांदा पावसामुळे सडत होता. शिवाय कांद्यावर करपा रोग पडत होता. वेळोवेळी औषधफवारणी करुन कसेबसे शेतकरी चांगल्या प्रतीचा कांदा आणला. कांदा रानात असेपर्यंत चांगले दर मिळेल असे वाटत होते. मात्र, बाजारात दाखल झाल्यावर अचानकपणे दर कमी झाल्याने शेतकरीवर्गामध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
................
सध्या आवक कमी झाली आहे. कारण शेतकरी ज्वारी काढण्यामध्ये व्यस्त आहे. उन्हाळी कांदा काढण्यात येणार आहे. तरीसुद्धा कांद्याचे भाव निम्म्यावर आला आहे.
-पोपटलाल दोभाडा, आडत व्यापारी
आमच्याकडे दीड ते दोन एकर कांदा आहे. काढणीचा आहे भाव अडीच ते तीन हजार रुपये होता. मात्र या दहा दिवसांत दर कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च केलेला कांदा जर भाव असाच राहिला तर कवडीमोल किमतीने विकावा लागणार आहे. त्यामुळे फटका बसणार आहे.
-बंडू माळी, कांदाउत्पादक शेतकरी