सोलापूर: गतवर्षीपेक्षा यावर्षी कांद्याला चांगला दर राहिल्याने या वर्षातील कांद्याची आवक एक लाख ३१ हजार क्विंटलने वाढली असताना उलाढालीत मात्र मोठी म्हणजे ३८४ कोटी २४ लाख ४४ हजारांची भर पडली आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक दरवर्षी वाढत असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा उलाढालीत नाशिक जिल्ह्यातील काही बाजार समित्यांशी स्पर्धा करीत आहे. लासलगाव, पिंपळगाव बसवंत व उमराणा या नाशिक जिल्ह्यातील कांदा उलाढाल करणाºया राज्यातील प्रमुख बाजार समित्या आहेत. या बाजार समित्यांशी सोलापूर बाजार समितीची स्पर्धा सुरू आहे. यावर्षी कांद्याला नोव्हेंबरपासून चांगला दर असल्याने व दर टिकून राहिल्याने कांदा उलाढालीचा आकडा जसा वाढत गेला तशी रक्कमही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. मागील दोन वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता कांद्याची आवक वाढली तशी रक्कम कमी झाली व वाढल्याचेही दिसते.
२०१५-१६ या एका वर्षात सोलापूर बाजार समितीमध्ये ४५ लाख ९६ हजार ७६५ क्विंटल कांद्याची आवक झाली व त्याच्या विक्रीतून ५३४ कोटी ४० लाख ५३ हजारांची उलाढाल झाली होती. मागील वर्षी २०१६-१७ मध्ये वर्षभरात बाजार समितीमध्ये ४७ लाख २६ हजार ७६५ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. मात्र मातीमोल दर मिळत असल्याने अवघे २४० कोटी १४ लाख ९४ हजार २०० रुपयांची उलाढाल झाली होती. यावर्षी एप्रिल ते ३१ मार्चपर्यंत कांद्याची ४८ लाख ५८ हजार १२५ क्विंटल कांद्याच्या विक्रीतून तब्बल ६२४ कोटी ३९ लाख ३८ हजार २०० रुपये मिळाले आहेत. १५-१६ मध्ये किमान दर प्रति क्विंटल ५० रुपये तर कमाल दर प्रति क्विंटल ७ हजार ४०० रुपये व सर्वसाधारण एक हजार रुपये दर मिळाला होता. १६-१७ मध्ये किमान दर क्विंटलला १०० रुपये व कमाल दर क्विंटलला २१०० रुपये तर सर्वसाधारण ५०० रुपये होता. यावर्षी १७-१८ मध्ये किमान दर क्विंटलला ५० रुपये व कमाल दर ५ हजार २५० रुपये तर सर्वसाधारण २१०० रुपये मिळाला.
- - सोलापूर बाजार समितीमध्ये २०१५-१६ या वर्षांपेक्षा २०१६-१७ मध्ये कांद्याची आवक एक लाख ३० हजार क्विंटलने वाढली होती.
- - २०१५-१६ पेक्षा १६-१७ मध्ये एक लाख ३० हजार क्विंटलने आवक वाढली असताना दर कमी असल्याने २९४ कोटी २५ लाख ५८ हजार ८०० रुपयांची उलाढाल झाली होती.
- - २०१६-१७ पेक्षा १७-१८ मध्ये कांद्याची आवक एक लाख ३१ हजार ३६० क्विंटलने वाढली असताना दरात मोठी वाढ झाल्याने ६२४ कोटी ३९ लाख ३८ हजार २०० रुपयांची उलाढाल झाली.
- - १६-१७ या वर्षापेक्षा १७-१८ मध्ये कांद्याची एक लाख ३१ हजार ३६० क्विंटलची आवक वाढली असली तरी दरात वाढ झाल्याने तब्बल ३८४ कोटी २४ लाख ४४ हजाराने उलाढाल वाढली आहे.
अन्य जिल्ह्यातूनही कांद्याची आवक बाजार समितीमध्ये होत असली तरी सोलापूर जिल्ह्यातील कांद्याचे क्षेत्र व उत्पादनही दरवर्षी वाढत आहे. जिल्ह्यातून कांद्याचा व्यापार वाढल्याने पैशाचीही वाढ होत आहे. - मोहन निंबाळकरसचिव, सोलापूर बाजार समिती