सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन केला होता. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे पुन्हा अनलॉक करण्यात आला आहे, मात्र यामध्ये शाळा ‘लॉक’ करण्यात आल्या आहेत. यामुळे मोबाईलवरून शाळेचे वर्ग चालणार असून, शिक्षणाच्या ऑनलाईन युगात विद्यार्थी घरी बसून धडे गिरवणार आहेत.
कोरोना संसर्गजन्य आजारामुळे शहर व जिल्ह्यातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. गेल्यावर्षी ऐन परीक्षेच्या कालावधीमध्ये लॉकडाऊन लागल्यामुळे शाळा बंद ठेवल्या होत्या. संपूर्ण वर्ष शाळा बंदच राहिली त्यानंतर २०२१-२२ या कालावधीमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होईल असे वाटत होते; मात्र तिसरी लाट येणार आहे. या लाटेमध्ये लहान मुलांना धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे यंदा ही शाळा अद्याप बंद ठेवण्यात आल्या आहेत. बाजारपेठा व अन्य व्यवहार चालू झाले; मात्र शाळा चालू करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा झाल्या? पुढील वर्गात कसे गेले आणि बघता बघता वर्ष कसे गेले समजले नाही. यंदाच्या वर्षीही तीच परिस्थिती आहे त्यामुळे मुलांसाठी शाळा बंद राहणार आहे. शाळेची घंटा नाही, वर्गात तास नाहीत, मैदानावर बागडणारी मुले नाहीत अशा अवस्थेत निर्मनुष्य असलेल्या शाळेत फक्त शिक्षक येऊन ऑनलाइन धडे शिकवणार अन् विद्यार्थी घरात बसून शिक्षण घेणार आहेत.
शाळा सुरू करायची म्हटली तर...
0 शाळा सुरू करण्याचे आदेश मिळाले नाहीत त्यामुळे कर्मचारी अजून मधून घेऊन जातात. शाळा सुरू करायची म्हटली तर साफसफाईसाठी किमान दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. शाळेचे अंतर्गत वास्तूचे साहित्याचे नुकसान झाले असेल तर त्याची डागडुजी करण्यासाठी खर्च येतो. जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकेची शाळा असेल तर त्यांना दुरुस्तीच्या खर्चासाठी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव द्यावा लागणार. शासनाची मंजुरी असलेल्या शाळांमध्ये देखील डागडुजीसाठी प्रस्ताव तयार करून शिक्षणाधिकारी कार्यालयाला पाठवावा लागतो. पैसे मंजूर झाल्यानंतर डागडुजी करता येते. खासगी शाळांमध्ये प्रशासनाकडून खर्च द्यावा लागतो.
गुरुजींची शाळा सुरू होणार...?
- 0 दरवर्षी दि.१५ जून रोजी शाळेची घंटा वाजत असते. विद्यार्थ्यांऐवजी शिक्षक शाळेत उपस्थित राहणार आहेत.
- 0 वर्ग घेण्यासाठी शिक्षक आपल्या वर्गात जाणार; मात्र ते कॅमेऱ्यासमोर उभे राहून घर बसलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देणार. तर काहीजण मोबाईलवरून अभ्यास पाठवून देणार.
- 0 ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल नाही त्यांना शिक्षक स्वतः घरी जाऊन नोट्स देणार आणि अभ्यास तपासणार आहेत.
कोविडमुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ऑनलाइन शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शासनाचा आदेश येईपर्यंत मोबाईलवरून विद्यार्थ्यांना अभ्यास दिला जाणार आहे. ग्रामीण भागात ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही अशांच्या घरी जाऊन शिक्षक अभ्यास तपासणार आहेत. शहरात जवळपास सर्व विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाइल असल्यामुळे अडचण येणार नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित शाळांना देण्यात आल्या आहेत.
- संजयकुमार राठोड, प्राथमिक शिक्षणाधिकारी
- जिल्ह्यातील एकूण शाळा - ४७८८
- जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी - ८५७१५१
- जिल्ह्यातील एकूण शिक्षक - ३१००६