सोलापूर : तुमचे सीमकार्ड व्हेरिफिकेशन करायचे आहे, दहा रुपयांचा रिचार्ज करा असे सांगून लाखो रुपये बॅंकेच्या खात्यातून काढले जात आहेत. सोलापूर शहरात असे दोन प्रकार घडले असून, यामध्ये एका डॉक्टर महिलेचीही फसवणूक झाली आहे. मेसेजद्वारे ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढत असून, दहा दिवसांत तीन गुन्हे दाखल. नागरिकांनी सतर्क रहावे असे, आवाहन सायबर क्राइमच्या वतीने करण्यात आले आहे.
बसवराज सिद्रामप्पा कोनापुरे (वय ७३, रा. सुविधानगर, विजापूररोड) हे घरात असताना २० जून रोजी सकाळी ११ वाजता एका नंबरवरून फोनवरून मॅसेज आला. मेसेचमध्ये तुमच्या सीमकार्डचे कागदपत्र पेंडिंग आहे, कस्टमर केअरला कॉल करा, असे टाइप करण्यात आले होते. बसवराज कोनापुरे यांनी विश्वास ठेवून मॅसेज आलेल्या मोबाइलवरून कॉल केला. तेव्हा समोरील व्यक्तीने मी बीएसएनएल कस्टमर केअरमधून बोलत आहे असे म्हणाला. त्यानंतर त्याने मोबाइलवरून ऑनलाइन सर्व्हिस ॲप डाऊनलोड करून तुमच्या एटीएम कार्डद्वारे दहा रुपये ऑनलाइन रिचार्ज करा, असे सांगितले. बसवराज कोनापुरे यांनी ऑनलाइन रिचार्ज केला तेव्हा त्यांना चार अंकी ओटीपी आला. तो समोरील व्यक्तीने ओटीपी नंबर सांगण्यास सांगितले. त्यानुसार बसवराज कोनापुरे यांनी चारवेळा आलेले ओटीपी नंबर सांगितले. ओटीपी नंबर सांगितल्यानंतर त्यांच्या खात्यातून २५ हजार, १० हजार, पुन्हा १० हजार आणि ४ हजार ८०० रुपये कट होऊन पेटीएम नोयडा यूपीआय येथे खरेदी केल्याचा मेसेज आला.
साडेनऊ लाखांचीही झाली अशीच फसवणूक
- दहा दिवसांत १७ व १८ जून रोजी दोन दिवसांत अशाच पद्धतीने १० रुपयाचा रिचार्ज करण्यास सांगून राजेंद्र पाटील (वय ६१, रा. दत्तनगर कुमठेकर हॉस्पिटलजवळ जुळे सोलापूर) यांच्या खात्यातून तब्बल नऊ लाख १६ हजार ४९९ रुपये काढून घेण्यात आले होते. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा दाखल झाला नाही तोपर्यंत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात डॉ. मीरा बाबूराव तीर्थकर (वय ३२, रा. शिवाजीनगर, बाळे) यांनाही ६ एप्रिल रोजी असाच एक फोन आला होता. दहा रुपयांचे रिचार्ज करण्यास सांगून ४६ हजार १९५ रुपये बँक खात्यातून काढून घेतले.
बळी पडू नका : बायस
फोन किंवा मॅसेजद्वारे टिम विव्हर, क्वीक सपोर्ट, अेनी डेस्कसारखे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. त्यानंतर एक कोड येतो तो सांगितल्यानंतर आपण जे काय करतो ते संबंधित व्यक्तीला समजते. दहा रुपयांचा रिचार्ज करण्यास सांगितले. त्यामुळे कॅस बॅक, व्हेरिफिकेशन डेबिट कार्डचे डिटेल, इंटरनेट बॅंकिंग व यूजर आयडी पासवर्ड समोरच्या व्यक्तीला समजतो आणि बॅंकेतील रक्कम तत्काळ काढून घेतली जाते. नागरिकांनी अशा कॉल व मॅसेजपासून सावध रहावे. शक्यतो दुर्लक्ष करावे अन्यथा फसवणूक होते. नागरिकांनी अज्ञात व्यक्तीकडून येणाऱ्या कोणत्याही भूल थापाला बळी पडू नये, असे आवाहन सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक विरेंद्रसिंग बायस यांनी केले आहे.