आदिनाथ कारखाना शिखर बँकेने आ. रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोला भाडेतत्त्वावर दिला आहे; पण त्याचा कालावधी १५ की २५ वर्ष यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भात शिखर बॅंकेने निविदा मागवून बारामती ॲग्रोला दिल्याचे जाहीर केले. मात्र, अद्यापही कारखाना देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ मार्चला ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा ठेवली. या सभेवर सभासदांसह काही संचालकांचा आक्षेप आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून आदिनाथ भाडेतत्त्वावर देण्याचा विषय अद्यापही मार्गी लागलेला नाही.
महाराष्ट्र शासनाच्या ८ सप्टेंबर २०२० रोजीच्या शासन आदेशानुसार पाच हजार मेट्रिक टन क्षमता असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्याला वार्षिक तीन कोटी भाडे मिळणार आहे. शासन आदेशानुसार कारखाना जास्तीत जास्त १५ वर्षांसाठी दिला जाऊ शकतो. मात्र, आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोला २५ वर्षांसाठी आदिनाथ हवा असून त्यासाठीच सर्व काही सोंग सुरू असल्याचे कांबळे यांनी सांगितले. हा कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांची मान्यता घेणे गरजेचे आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे शक्य नाही. त्यामुळे ऑनलाइन सभेचा मार्ग काढला असला तरी किती सभासदांना या सभेला ऑनलाइन हजर राहता येईल याबाबत शंका आहे. गत दोन महिन्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असताना त्यावेळी सभा का बोलावली नाही, असाही प्रश्न रमेश कांबळे यांनी उपस्थित केला.
कोट ::::::
आदिनाथ कारखान्याची ऑनलाइन सभा न घेता कारखानास्थळावर घ्यावी. कारखान्याचे सर्व ऊस उत्पादक शेतकरी हे जुने सभासद आहेत. त्यांना मोबाईलमधले काहीच समजत नाही. ऑनलाइन त्यांना काहीच कळत नाही. त्यामुळे कारखानास्थळावर अंतर राखून सर्वसाधारण सभा घ्यावी. कारखाना भाडेतत्त्वावर द्यायचा की नाही, याबाबत सभासद सभास्थळी ठरवतील.
-
रमेश कांबळे,
व्हा. चेअरमन, आदिनाथ कारखाना
कोट ::::::::
२० मार्च रोजी सोगाव (पूर्व) येथे लक्ष्मण गोडगे यांच्या शेतात संचालकांची मिटिंग ठेवली. प्रत्यक्षात ती झालीच नाही. आता ३१ मार्चला ऑनलाइन सभा हे सोंग केले आहे. प्रथम ४ जानेवारी २०२१ लिलावाचा निर्णय झाला. तेव्हा १५ वर्षांसाठी देण्याचे ठरले नंतर पुन्हा निविदा मागवून १२ जानेवारी २०२१ ला लिलाव घेऊन २५ वर्षांसाठी घेण्यात आला तेव्हा बारामती ॲग्रोने शिखर बँकेला ६७ लाख रुपये भरले. त्यानंतर अजूनही करार पूर्ण झालेला नाही. सर्व मॅनेज करून आदिनाथ कारखान्याचा बळी दिला जातोय.
- संतोष पाटील,
संचालक आदिनाथ कारखाना
कोट :::::::
आम्ही वर्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली, मात्र कोरोनामुळे परवानगी मिळाली नाही. त्यामुळे ऑनलाइन सभा घेण्यात येत आहे. आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर देताना शिखर बँकेने निविदा १५ वर्षांसाठी काढली, पण निविदा भरणाऱ्या कारखान्याने २५ वर्षांसाठी कारखाना द्यावा, अशी मागणी केल्याने शिखर बँकेने आदिनाथ कारखाना २५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे.
-
धनंजय डोंगरे,
चेअरमन, आदिनाथ कारखाना.