सुजल पाटील
सोलापूर : लॉकडाऊनमध्ये मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातून पार्सल गाड्या सुरू केल्या; मात्र या गाड्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. मागील १९ दिवसात पार्सल गाडीने फक्त २७५ क्विंटल मालाची वाहतूक झाल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
सोलापूर विभागातून ८ एप्रिलपासून पार्सलची वाहतूक सुरू करण्यात आली. सोलापूर विभागातून मुंबई-चेन्नई, मुंबई-सिकंदराबाद आणि साप्ताहिक गाडी राजकोट-कोईमतूर ही धावत आहे; मात्र रेल्वे प्रशासनाला पार्सल गाड्यांमधून म्हणावे तसे उत्पन्न मिळत नसल्याचे सांगण्यात आले. रस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतूक कमी आर्थिक बजेटमधून होत आहे. याचा फायदा व्यापारी, कारखानदार, शेतकºयांनी घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
कृषी मालाची साखळी खंडित झाली आहे. या कोरोना साथीच्या आजारात शेतकºयांकडून खरेदी करणारे एजंट कोणताही धोका घेत नाहीत. कामगारांची कमतरता, मार्केट यार्ड बंद , नागरी प्रशासनाद्वारे निर्बंध इत्यादी कारणांमुळे ते शेतकºयांकडून माल खरेदी करीत नाहीत. शेती उत्पादन हे नाशवंत असल्याने त्वरित निकाली काढावे लागत आहे. अशा एक ना अनेक कारणांमुळे प्रतिसाद कमी मिळत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
उत्पन्न मिळाले फक्त ५० हजार...- व्यापारी, कारखानदार, शेतकरी यांच्या मागणीनुसार मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने ८ एप्रिलपासून पार्सल वाहतूक सुरू केली. सुरुवातीला मुंबई-चेन्नई ही गाडी सुरू केली. प्रतिसाद पाहता पुन्हा मुंबई-सिकंदराबाद सुरू केली, त्यानंतर साप्ताहिक म्हणून राजकोट-कोईमतूर ही गाडी सुरू केली. मागील १९ दिवसात रेल्वेला पार्सल वाहतुकीतून केवळ ५० हजारांचे उत्पन्न मिळाल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
सर्वांनी रेल्वे पार्सल वाहतुकीचा मार्ग अवलंब करावा. रस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतुकीचे बरेच फायदे आहेत. पार्सल गाड्या या वेळापत्रकानुसार धावतात आणि संबंधित ठिकाणावर वेगाने माल पोहोचवितात. राज्य हद्दीवर वाहतुकीच्या मुद्यांना याचा सामना करावा लागत नाही. रेल्वे पार्सल वाहतुकीचे दर देखील रोडवेच्या तुलनेत आहेत. तसेच या पार्सल गाड्या पुढेही बºयाच कालावधीपर्यंत सुरू राहतील. तसेच ट्रान्सशीपमेंटलाही परवानगी आहे, त्यामुळे हा माल भारताच्या कोणत्याही ठिकाणी पाठविला जाऊ शकतो.- प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, मध्य रेल्वे, सोलापूर