सोलापूर : गेल्या साडेचार वर्षांत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी शिवसेनेच्या पदाधिकाºयांना विश्वासात घेऊन काम केले नाही याची खंत शिवसेना पदाधिकाºयांच्या मनात आहे. या निवडणुकीत त्यांनी विश्वासात घेऊन काम केले तरच २३ मे रोजी विजयदिन पाहायला मिळेल, असा इशारा शिवसेनेचे संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी दोन देशमुखांच्या उपस्थितीत भाजपला दिला.
महायुतीच्या पदाधिकाºयांचा विजयी संकल्प मेळावा झाला. तानाजी सावंत म्हणाले, भाजपा आणि शिवसेनेची युती झाली आहे. पण खाली कार्यकर्त्यांचे मनोमीलन झाले आहे की नाही याबद्दल संभ्रम होता. काँग्रेसच्या नेत्यांनी संभ्रमात टाकण्याचे काम केले. पण पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना मला खेदाने सांगावे लागते की तुम्ही गेल्या साडेचार वर्षांत शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाºयांना विश्वासात घ्यायला हवे होते.
आपण सर्वजण विस्थापित आहोत. तळागाळातील कार्यकर्ता आपला केंद्रबिंदू मानून काम करायला हवे होते. तुम्ही या निवडणुकीत शिवसेनेच्या पदाधिकाºयांना विश्वासात घेऊन काम केले तरच २३ मे रोजी विजयदिन पाहायला मिळेल, असे ते म्हणाले. कुठे काही अडचण असेल तर सांगा मी ती दूर करतो, असेही सांगायला सावंत विसरले नाहीत.
पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले, तानाजी सावंत यांनी खंत व्यक्त केली. पण दोनवेळा स्वत:हून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोठे यांच्या घरी गेलो होतो. यापुढेही सहकार्य राहिले.
महाराज, बापू बोलले... नीलम तार्इंनी सावरले..- दोन देशमुखांच्या वादामुळे शहराचे वाटोळे झाल्याची टीका काँग्रेसवाले करतात. त्याच्या बातम्या वर्तमानपत्रात छापून येतात याबद्दल सहकारमंत्री देशमुख यांनी खंत व्यक्त केली. त्यावर नीलम गोºहे यांनी वर्तमानपत्रात बातम्या छापून आल्या तरी तुम्ही मनाला लावून घेऊ नका. काम करत राहा. या जिल्ह्यातील पत्रकारांचे सल्ले मी सुद्धा ऐकते, असा सल्ला देशमुखांना दिला. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी आपल्या भाषणात शिवसेनेने भाजपला खांदा द्यावा, असे सांगितले. त्यावरुन मंचावर खसखस पिकली. नीलम गोºहे या विषयावर बोलताना पालखीला खांदा दिला जातो. याचा वेगळा अर्थ काढू नका, असे सांगितले.
मंचावर बरोबरीच्या स्थानासाठी आग्रह - या मेळाव्याला शिवसेनेचे शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सावंत बंधू, महेश कोठे, गणेश वानकर यांच्यासह सेनेच्या प्रमुख महिला पदाधिकाºयांना मंचावर स्थान मिळायला हवे, याबाबत सेनेचे पदाधिकारी आग्रही असल्याचे पाहायला मिळाले. भाजपाचे पदाधिकारी आवर्जून सर्वांना मंचावर बोलावत होते. विशेष म्हणजे शिवसेनेच्या शहर पदाधिकाºयांनी तानाजी सावंत आणि रावसाहेब दानवे या दोघांना स्वतंत्रपणे भले मोठे हार घालून त्यांचे स्वागत केले.