आषाढी वारी नियोजनाबाबत सांस्कृतिक भवन प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अरविंद माळी, तालुका आरोग्य अधिकारी एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम उपस्थित होते.
गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही आषाढी वारी प्रतीकात्मक स्वरूपात पार पाडण्यासाठी अधिकारी, पालखी प्रमुखांना देण्यात आलेली जबाबदारी समन्वयाने पार पाडावी. सर्व मानाच्या प्रमुख दहा पालख्या आषाढीच्या पूर्वसंध्येला वाखरी पालखी तळावर बसने येणार आहेत. त्यादृष्टीने पंढरपूर नगरपालिकेने वाखरी पालखी तळावरील अनावश्यक काटेरी झुडपे काढून स्वच्छता करावी,नदी पात्रात स्वच्छता राहील याची दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाने वारकरी व भाविकांची आरोग्य तपासणी करावी. अशा सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या.
४०० वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश
पंढरपुरात भरणाऱ्या आषाढी वारीसाठी प्रमुख संतांच्या पालख्यांबरोबर आलेल्या ४०० वारकऱ्यांना शासनाने ठरवून दिलेल्या दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी प्रवेश मिळणार आहे. यासाठी त्यांना प्रस्थानापूर्वीच कोरोनासंबंधित आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
-----