सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळामुळे पिकांना फटका बसून शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. गेल्या वर्षी खरीप हंगामात जिल्ह्यातील ५५ हजार ८५१ शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती विमा कंपन्यांना कळवली होती. त्यातील ४४ हजार ५३२ शेतकऱ्यांनी दिलेली माहिती ग्राह्य धरली. जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामासाठी कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा २ लाख ७० हजार ३९४ शेतकऱ्यांनी १ लाख ८९ हजार ८१५ हेक्टर क्षेत्राची प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी नोंदणी केली होती.
पीक विम्यापोटी शेतकरी हिस्सा १० कोटी ३४ लाख रुपये व सरकारचा हिस्सा ११० कोटी असा १२० कोटी ३४ लाख रुपये एवढा विमा हप्ता विमा कंपनीकडे भरला होता. यातील केवळ ४४ हजार ५३२ शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेतून मदत मिळाली आहे. उर्वरित तब्बल २ लाख २५ हजार ८६२ शेतकऱ्यांना मदतीसाठी अपात्र ठरविले आहे. विमा कंपन्यांनी ३९ कोटी ५२ लाख रुपयांचा लाभ जिल्ह्याला दिला असला तरी अनेक शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.
पीक विमा भरलेली तालुकानिहाय आकडेवारी
उत्तर सोलापूर १४५२, दक्षिण सोलापूर ८९७, बार्शी ३० हजार ८१६, अक्कलकोट १७१३, मोहोळ ६३७, माढा १८२, करमाळा २५७, पंढरपूर १२, सांगोला ३९, माळशिरस ९७, मंगळवेढा १९४१ अशा सोलापूर जिल्ह्यातील ३८ हजार ४३ शेतकऱ्यांना ३५ कोटी ४ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. तर काढणी पश्चात नुकसान झालेल्या ६ हजार ४८९ शेतकऱ्यांना ४ कोटी ४६ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.