पुढच्या वर्षी आपल्या मुलांचे लग्न धूमधडाक्यात करून त्यांचे हात पिवळे करू, अशा बेतात असलेल्या वधू-वर पित्यांना कोरोनाच्या कमबॅकने पुन्हा झटका दिल्याने त्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. वारंवार लॉकडाऊन, संचारबंदी, विवाहाचे नियम व अटीला कंटाळलेल्या तरुण-तरुणी ’आता कुठंवर लॉकडाऊन, माझं लगीन गेलंय राहून’ असा प्रश्न विचारत आहेत.
सांगोला तालुक्यात गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्याने पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कडक निर्बंध लागू केल्याने परिणामी अनेक नवरदेव, नवरीचा पुन्हा लॉकडाऊन सुरु झाल्याने हिरमोड झाला आहे. त्यामुळे सध्या दोन वर्षांपासून लग्नसराईवर कोरोनाचे सावट असल्याने नाते जमविण्यासाठी ‘हुंडा नको फक्त मुलगी द्या,’ अशी मागणी नवरदेव वधू पित्यांकडे करताना दिसत आहे.
एकदिवसीय लग्नावर भर
समाजात आजही अनेक जण वधूपक्षाकडे हुंड्याची तर मागणी करतातच शिवाय चांगले मंगल कार्यालय, एवढ्या लोकांची जेवणाची व्यवस्था अशा विविध मागण्या करत होते. मात्र, लॉकडाऊनमुळे वरपक्षाकडून फक्त आम्ही घरातील मोजके लोकच लोक येऊन वधूला घेऊन जाऊ, असे सांगून एकदिवसीय (वन डे) लग्नावर भर देत असल्याचे चित्र आहे. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह पार पडत असल्याने वधूपित्याच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी होत आहे. अवास्तव खर्चाला फाटा देत साधेपणाने विवाह पार पाडण्यासाठी वर-वधू पित्याची धावपळ सुरू आहे.