टेंभुर्णी : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते टेंभुर्णी शहरातून जाणाऱ्या ६ कि. मी. जुन्या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे उद्घाटन होऊन पाच वर्षे झाली. या रस्त्याच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. हे काम त्वरित सुरू करावे म्हणून मंत्री नितीन गडकरी यांचा गांधीगिरी मार्गाने सत्कार करून आंदोलन करणार असल्याचे शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या आंदोलनाबाबत कोकाटे म्हणाले, २५ मार्च २०१६ रोजी रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोलापूर येथे कोट्यवधींच्या कामाचे उद्घाटन झाले. यापैकी जुने सहा किलोमीटर रस्ते हे टेंभुर्णीतून जाणार असून त्यांचा खर्च १०७ कोटींवर आहे. या कामाचे उद्घाटन होऊन पाच वर्षे झाले तरी प्रत्यक्ष या कामास सुरुवात झालेली नाही. याबाबत वेळोवेळी मंत्री गडकरी यांची भेट घेतली. तसेच त्यांचे स्वीय सहायक सुधीर देऊळगावकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला; परंतु आतापर्यंत हे काम मार्गी लागले नाही. गांधीगिरी मार्गाने सत्कार करण्याबाबतचे निवेदन संजय कोकाटे यांनी गडकरी यांना दिले आहे.
गडकरींची भेट होत नसल्याने २६ मार्च रोजी सोलापूर येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यांचा सत्कार करणार असल्याचे काेकाटे यांनी सांगितले. याबराेबरच मुंबई येथे नॅशनल हायवेचे मुख्य व्यवस्थापक यांचा सत्कार करणार आहे.
----
उड्डाणपुलावर खड्डे
पुणे-सोलापूर महामार्गाची अवस्था खूप दयनीय झाली आहे. प्रत्येक उड्डाणपुलावर रस्ता खरडून ठेवला आहे. त्यामुळे खड्डे पडले आहेत. रात्रीच्या वेळी अनेक अपघात होऊन लोकांचे बळी गेले आहेत. टेंभुर्णी शहरातून गेलेल्या बायपास रोडचे काम एन. एच. ए. आय.च्या मार्गदर्शक धोरणानुसार झालेले नाही. महामार्गावर अनेक ठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी जागा ठेवल्या आहेत. कुर्डुवाडी चौकातील उड्डाणपुलाखालून होणारी वाहतूक एकदम रस्त्यावर येत आहे. त्यामुळे बरेच अपघात झाले आहेत. टेंभुर्णी येथील संपूर्ण बायपास रोडवर सर्व्हिस रोडची गरज असल्याची अपेक्षा संजय कोकाटे यांनी व्यक्त केली.
---
टेंभुर्णी शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्गाच्या कामाबाबत मी काहीही सांगू शकत नाही.
- संजय कदम
प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सोलापूर.