बार्शी (सोलापूर) : भगवान विष्णूचे नऊ अवतार अन् त्यांचा महिमा सर्वांना ठाऊक आहे, पण भगवंताच्या रूपातील श्री विष्णू बार्शीत विराजमान आहेत. हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आलेले भगवंत स्वरूपातील विष्णूचे हे देशातील एकमेव मंदिर असून, सोमवारी वैशाख शुद्ध द्वादशीला ‘श्रीं’चा प्रकट दिन साजरा होत आहे. यंदा कोरोनामुळे भक्तांच्या उपस्थितीशिवाय केवळ विधी होणार आहेत, अशी माहिती मंदिर समितीतर्फे देण्यात आली.राजा अंबरीषाच्या रक्षणासाठी साक्षात् श्रीविष्णूने लक्ष्मीसह ‘भगवंत’ या नावाने येथे अवतार घेतल्याचा पुराणात उल्लेख आहे. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे एकादशी करून श्री पांडुरंगाचे दर्शन घेऊन बार्शी येथे द्वादशीदिवशी श्रीभगवंत दर्शन-पूजनानंतर उपवास सोडायचा, असा वारकऱ्यांचा वर्षानुवर्षांचा प्रघात पडलेला आहे.मंदिराच्या गाभाऱ्यासमोर गरुड खांब आहे. नक्षीदार कलाकुसर असलेला मंदिराचा सभामंडप सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचा असावा, असा अभ्यासकांचा कयास आहे. मंदिरात दत्त महाराज, विठ्ठल-रुक्मिणी, जोगा परमानंद, गणपती आदी देवतांच्या मूर्ती आहेत. या मंदिरासाठी नानासाहेब पेशव्यांनी १७६०, इस्ट इंडिया कंपनीने १८२३ मध्ये सनदा देऊ केल्या. बार्शीचे भगवंत मंदिर पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिराशी साधर्म्य साधणारे आहे. सोळाखांबी मंदिर आणि गरुड खांब मंदिराचे आध्यात्मिक आणि प्राचीन महत्त्व अधोरेखित करतात.
उत्सव अन् सोहळे आषाढी, कार्तिकी एकादशीला गरुडावर आरूढ श्री भगवंताची मिरवणूक निघून नगर प्रदक्षिणा होते. पौर्णिमेला छबिना निघतो. रथातून ही उत्सवमूर्तीची मिरवणूक निघते. पालखी निघते. मंदिरात नित्य काकडाआरती, नित्य पूजा-महापूजा, सायंकाळी धुपारती व रात्री शेजारती आदी कार्यक्रम होतात. वैशाख शुद्ध षष्ठी ते वैशाख शुद्ध द्वादशी म्हणजे श्री भगवंत प्रकट दिनापर्यंत श्री भगवंत प्रकट दिन सप्ताह, भागवत सप्ताह, तुकाराम बीज, गोकुळ अष्टमी, दासनवमी व वर्षभर प्रवचने, कीर्तनाचा कार्यक्रम व अन्य उत्सवही होतात.