सोलापूर : लॉकडाऊनमुळे बेहाल झालेल्या सोलापूर शहरात शुक्रवारपासून सर्व दुकाने सुरू होणार आहेत. मात्र या दुकानांमध्ये कॅशलेश व्यवहार करण्यात यावे, अन्यथा ही दुकाने बंद करण्यात येतील, अशी अट नवे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी घातली आहे. शहरातील दुकाने शुक्रवारी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळेत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. रस्त्याच्या उजव्या बाजूची दुकाने सम तारखेस तर डाव्या बाजूची दुकाने विषम तारखेस उघडी राहतील. ज्या रस्त्यांवर दुभाजक आहे अशा रस्त्यांच्या दोन्ही बाजूकडील एक दुकान चालू तर दुसरे दुकान बंद राहील.
एक दिवसाआड एक यापध्दतीने ही दुकाने चालू ठेवायची आहेत. परंतु, या दुकानांमध्ये कॅशलेस व्यवहार बंधनकारक राहणार आहेत. कॅशलेस सेवा होत नसल्याचे आढळल्यास तत्काळ दुकाने बंद करण्यात येतील, असे आदेश महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले आहेत.