पंढरपूर : तिसंगी- सोनके तलावाचे कालवा गेट नादुरुस्त झाल्याने वाखरी, गादेगाव, उपरी, भंडीशेगावसह नऊ गावांतील उभी पिके धोक्यात आली आहेत. कालव्याचे दार काढा, साहेब! कालव्याचे दार... असे म्हणण्याची वेळ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर आली आहे. दोन दिवसांत दार काढून पाणी न सोडल्यास आंदोलन करण्याचा इशारा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी दिला आहे. रबी व उन्हाळी हंगामात तिसंगी तलावातून दरवर्षी तीन पाणी पाळ्यांचे नियोजन करण्यात येते. यंदा रबी हंगामासाठीची पाणीपाळी सोडण्याचे नियोजन करण्यात येत असताना काही समाजकंटकांनी कालवा गेटच्या ठिकाणी खडीसह इतर घाण टाकल्याने दार काढता आले नाही. गेले दोन-तीन दिवस प्रयत्न करूनही दार न निघाल्याने आता वरिष्ठ पातळीवरून अभियांत्रिकीची यंत्रणा मागविण्यात येत असल्याचे उपविभागीय अभियंता नागेंद्र ताटे यांनी सांगितले.
तिसंगी तलाव यंदा शंभर टक्के भरल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, मका यासह ऊस, डाळिंब, अशी बागायती पिके घेतली आहेत. तलावाच्या पाण्याचा गादेगाव, वाखरी, उपरी, भंडीशेगाव, शेळवे, शिरढोण, खेडभाळवणी आदी गावांना फायदा होतो. तलावात पाणी असताना शेतातील उभी पिके करपून चालल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. यामुळे तलावाचे कालवा दार तात्काळ काढावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
नादुरुस्त दारामुळे पाणी सोडण्यास अडचण
कालव्याचे दार नादुरुस्त झाल्याने रबी हंगामासाठीचे पाणी सोडण्यास अडचणी येत आहेत. यासंदर्भात पाटबंधारे विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. गेले दोन-तीन दिवस पाणबुडीच्या साहाय्याने दार काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अद्याप दार निघालेले नाही. लवकरच अभियांत्रिकीची टीम बोलविण्यात येणार असून, त्यांच्याकडून दार काढण्यात येईल, अशी माहिती शाखा अभियंता अभिजित म्हात्रे यांनी दिली.
---
तिसंगी तलावातून पाणीपाळी सुरू असताना अचानक दार बंद करण्याचे, तसेच तलावाच्या ठिकाणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून होतो. त्याला तात्काळ आळा घालण्यात यावा. तलावाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. उभी पिके वाचवण्यासाठी तात्काळ कालव्याचे दार काढून पाणी सुरू करावे; अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन छेडले.
-तानाजी बागल,
जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना