सोलापूर : पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या धर्तीवर सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले व्हावे यासाठी वंचित बहुजन आघाडीने सोमवारी सिद्धेश्वर मंदिरासमोर आंदोलन केले.
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक तथा शहराध्यक्ष गणेश पुजारी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या पाच महिन्यांपासून सिद्धेश्वर मंदिर कुलूपबंद आहे दर्शनापासून भाविक वंचित आहे. कोरोनामुळे नगरवासिय भयभीत आहे ही भीती भय अन कोरोनाची चिंता दूर व्हावी ही वंचित बहुजन आघाडीची अपेक्षा आहे. मंदिरात गेल्याने अथवा तिथे डोळे मिटून ध्यान केल्याने मनातील भीती भय दूर होण्यास मदत होते. नियम,अटी घालून दिल्यास मंदिर खुले करण्यास काहीच हरकत नाही असे आनंद चंदनशिवे म्हणाले.
दरम्यान, वंचित च्या वतीने आंदोलन होणार असल्यामुळे सोमवारी सकाळपासूनच मंदिर परिसराकडे जाणारे रस्ते पोलिसांनी बंद केले होते. सकाळी अकराच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात केवळ ५० कार्यकर्ते जमले होते. त्यापैकी दहा ते पंधरा जणांना मंदिरापर्यंत सोडण्यात आलं. इथे फोटो पूजनानंतर कार्यकर्त्यांनी सिद्धरामेश्वराचा जयघोष केला नंतर नगरसेवक आनंद चंदनशिवे, नगरसेवक पुजारी यांच्यासह सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर आंदोलन संपलं. यावेळी शहर पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.