राजकुमार सारोळे पंढरपूर : देवा पांडुरंगा धाव बाबा धाव,आमच्यासाठी नाही बाबा या पशुपक्ष्यांसाठी, दया कर,असा पाऊस पाड अन्धरणीमातेची तहान भागवहे बोल आहेत जन्माने अंध असलेल्या शोभा व प्रभाकर कांबळे हे दाम्पत्य आणि तिचा भाऊ पंडित गायकवाड यांचे. येळी (ता. उमरगा) येथून पांडुरंग भेटीसाठी आलेल्या या तिघांनी देवाजवळ काय मागणे मांडले पाहा. देवा पांडुरंगा धाव, आमच्यासाठी नव्हे, तहानलेल्या धरणीमातेसाठी, पशुपक्ष्यांसाठी तरी पाऊस पाड. आम्हाला विश्वास आहे, तुला भक्ताची काळजी आहे, एकादशीनंतर तू निश्चित पाऊस पाडशील.
आषाढी एकादशी जवळ येईल तशी भक्तांना आस लागली आहे ती पांडुरंग भेटीची. संतांच्या पालख्या पंढरपूरसमीप येत असताना वैष्णवांचा मेळा मोठ्या प्रमाणावर चंद्रभागा तीरी जमला आहे. यामध्ये लहान-थोर सर्वांचाच समावेश आहे. या गर्दीत नामदेव पायरीजवळ पांडुरंगाच्या दर्शनासाठी वाट काढत आलेल्या तीन प्रज्ञाचक्षुंकडे लक्ष गेले. एकमेकांचे हात हातात धरून गर्दीतून धक्के खात हे तिघे वाट चालत होते. त्यांच्या चेहºयावर होता आनंद आपण पांडुरंगाच्या समीप आलो याचा. पुढे असणाºया पंडितांनी एका भाविकाला विचारले, ए बाबा नामदेव पायरी कुठे आहे. त्या भाविकाने साद दिली. तुम्ही माऊलीजवळच आला आहात, समोर गर्दी आहे, बाजूला टेका जरा. माऊलीच्या जवळ हा शब्द ऐकल्यावर या तिघांच्या चेहºयावर समाधानाचे हास्य पसरले आणि अंदाज घेत एकमेकाला सावरीत भिंतीला टेका दिला अन् हात जोडले.
उत्सुकता वाटली म्हणून जवळ जाऊन संवाद साधला. पांडुरंग कसा आहे असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, विठ्ठल सावळा आहे असे सांगतात. आम्ही स्पर्शाने त्याची अनुभूती घेतली. दिव्यांग रांगेतून आम्हाला थेट दर्शन मिळते. पूर्वी विठ्ठलाच्या मूर्तीला स्पर्श करता येत होते, पण आता पांडुरंग काचेत आहे असे सांगतात.
पायाला स्पर्श केल्यावर आम्हाला पांडुरंगाच्या दर्शनाचा आनंद मिळतो. एसटीने आम्ही पंढरपुरात आलो, आता पाच दिवस राहून सेवा करतो. पुन्हा गावी जाऊन वर्षभर भजन करून आमची गुजराण होते, अशी कहाणी त्यांनी सांगितली.
पतीबरोबर वारी..- पंडित गायकवाड हे वयाच्या दहाव्या वर्षांपासून आषाढी वारी करतात. बहीण शोभा हीसुद्धा जन्मापासून अंध. तरीही त्यांनी आपल्या नशिबाला कधी दोष दिला नाही. अशाही अवस्थेत जोडीदार मिळाल्याचा शोभा यांना आनंद. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून पतीबरोबर आषाढी वारी सुरू केली.