सोलापूर : सुसाट वाहनांना आवर घालण्यासाठी बंद असलेले सिग्नल पुन्हा कार्यान्वित करण्यात आले आहेत. १४ सिग्नलपैकी नऊ सुरू करण्यात आले असून पाच ठिकाणी सुरू असलेले काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. सिग्नलवर पुन्हा लाल, पिवळी व हिरवी लाईट दिसू लागल्या आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून शहरात फक्त डफरीन चौक, होटगी रोडवरील महावीर चौक आणि सिव्हिल पोलीस चौकातील सिग्नल सुरू होते. कोरोना काळाच्या काळात संचारबंदी दरम्यान हे सिग्नल बंद होते. संचारबंदी उठल्यावर फक्त तीन ठिकाणी सिग्नल सुरू होते. पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी पदभार घेतल्यानंतर शहरातील वाहतूक व्यवस्थेवर लक्ष केंद्रित केले. बंद असलेल्या सिग्नलची माहिती घेऊन त्यांनी महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला. नऊ सिग्नल चालू करून घेतले, पाच सिग्नल स्मार्ट सिटीच्या कामानिमित्त अद्याप बंद आहेत.
शहरातील रस्त्यावरून वाहनांची गर्दी वाढली आहे, तीन चौक सोडले तर अन्य कोठेही सिग्नल सुरू नव्हते. वाहने सुसाट वेगाने धावत असल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले होते. वाहनांना शिस्त लागावी यासाठी सिग्नल सुरू करून देण्यावर भर देण्यात आला होता. बुधवारी शहरातील १० सिग्नल सुरू झाले आहेत. राहिलेल्या चार सिग्नलचे कामही पूर्ण होत असून आठ दिवसात सर्व ठिकाणी सिग्नल सुरू होणार आहेत.
१२ तास सिग्नल, दरम्यान कारवाईही सुरू
० प्रत्येक सिग्नलच्या ठिकाणी वाहतूक शाखेचा एक कर्मचारी नेमण्यात आला आहे. सकाळी ८ ते दुपारी २ एक कर्मचारी तर दुपारी २ ते रात्री ८ एक कर्मचारी कार्यरत आहे. १२ तास सिग्नल सुरू असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी वेगळे कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
हे आहेत सिग्नलची ठिकाणे
० महिला हॉस्पिटल, महावीर चौक, पत्रकार भवन, गांधीनगर चौक, रंगभवन चौक, गुरूनानक चौक, डफरीन चौक, संत तुकाराम चौक, आसरा चौक, सरस्वती चौक, सिव्हिल चौक येथे सध्या सुरू आहे. आसरा चौक, सरस्वती चौक, भैया चौक, आम्रपाली चौकात स्मार्ट सिटीचे काम सुरू असल्याने सिग्नल बंद आहेत. वोडाफोन गॅलरी येथे एक पोल बंद आहे. हे पाच सिग्नल आठ दिवसात सुरू हाेणार आहेत.
वाहतुकीला शिस्त यावी यासाठी मोहीम राबवली जात आहे. लवकरच सर्व सिग्नल सुरू होतील, वाहनचालकांनी नियमांचे पालन करून स्वत: सुरक्षित रहावे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
डॉ. दीपाली धाटे, पोलीस उपायुक्त