सोलापूर: गेली तीन वर्षे सोलापुरात काम करताना जनतेमधून सकारात्मक प्रतिसाद मिळाला़ याच काळात पंढरपूरच्या प्रमुख अशा चार आषाढी वारीच्या माध्यमातून पंढरपूरच्या विठ्ठलाची सेवा करण्याचा अविस्मरणीय क्षण अनुभवता आला. कदाचित विठ्ठलानेच ही संधी दिल्याचे आपण मानतो, असे स्पष्ट करीत मावळते जिल्हा पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांनी टीमवर्कमुळे सोलापुरात आपणास चांगले काम करता आल्याची भावना पत्रकारांशी वार्तालाप करताना व्यक्त केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये त्यांच्या बदलीनिमित्त वार्तालाप आयोजित केला होता, यावेळी ते बोलत होते. कायदा व सुव्यवस्थेसाठी लोकांमधून सहभाग महत्त्वाचा आहे़ त्यादृष्टीने आपण राबविलेल्या प्रत्येक उपक्रमामध्ये जिल्ह्यातून जनतेचेही चांगले सहकार्य लाभले. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले त्याशिवाय शासनाच्या पैशाविना विविध गावांमधूनही लोकसहभागातून ही संकल्पना राबविण्यात आली. पोलीस खात्याने पुढाकार घेऊन सांगितले की लोक ऐकतात, असा अनुभव सोलापूर जिल्ह्यात काम करताना आल्याचे वीरेश प्रभू म्हणाले.
कर्तव्यात कसूर करणाºया पंधरापेक्षा कमी कर्मचाºयांना निलंबित केले. प्रत्येकाला चुका सुधारण्याची संधी दिली. गुंडागर्दी करणाºयांना धाक दाखविण्यासाठी हद्दपारीसारख्या कारवाया करण्यात आल्या. जनतेचे हित हा यामागचा हेतू होता, हे स्पष्ट करताना त्यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे क्षेत्रफळ मोठे आहे, लोकसंख्याही जास्त आहे, त्यामानाने पोलिसांचे मनुष्यबळ कमी आहे. सुमारे एक लाखाच्या मागे ७० कर्मचारी आहेत, त्यामुळे अधिक कर्मचारी मिळणे गरजेचे आहे. आपण स्थानिक स्थापन केलेल्या विशेष पथकाने तीन वर्षांमध्ये चांगली कारवाई, कामगिरी बजावली आहे़ अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणात धाडी टाकण्यात आल्या. सोलापूरसारखीच पोलिसांची टीम आपल्याला अन्यत्र मिळावी, अशी भावनाही वीरेश प्रभू यांनी व्यक्त केली़